गोंदिया : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेला दिलेली आश्वासने आधी पूर्ण करावी.  तेथील सध्या होत असलेल्या निवडणुकीत तर त्यांचीच तळ्यात मळ्यात सारखी स्थिती झाली आहे. त्यांनी आपली तब्येत आणि पक्ष सांभाळावा. महाराष्ट्रातील नेतृत्व खंबीर आहे आपले राज्य सांभाळायला आणि सैफ अली सारख्या प्रकरणाचा नायनाट करायला. केजरीवाल यांनी आपल्या सरकारचे उरलेले मोजके दिवस बद्दल विचार करावा, असे मत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्या आज शुक्रवारी देवरी येथे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्याद्वारे आयोजित भाजपच्या महिला सदस्या नोंदणी अभियान व हळदी कुंकू कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होत्या. मुंबईत सैफ अलीवर झालेल्या हल्ल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा हल्ला गुजरातच्या कारागृहात असलेल्या बिश्नोई गॅंग कडून सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप केला होता. राज्यात महायुतीचे फडणवीस सरकार आल्यानंतर बीड जिल्ह्यातील सरपंचाची निर्घृण हत्या प्रकरण आणि काल अभिनेता सैफ अली खान वर रात्री त्यांच्या राहत्या घरी झालेला हल्ला यावर विरोधकाकडून राज्यात कायद्याचे राज्य नसल्याचा आरोप केला जात आहे.

हेही वाचा >>> राष्ट्रीय संशोधन संस्था ‘व्हीएनआयटी’ने तयार केले नक्षत्र यंत्र…

या प्रश्नावर उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, की बीडच्या सरपंच हत्याप्रकरणी आरोपीवर मकोका लावण्यात आलेला आहे. प्रकरणाच्या तपास पण सीआयडी आणि एसआयटी कडे देण्यात आलेला आहे आणि या प्रकरणात कितीही मोठा माणूस गुंतलेला आढळून आल्यास त्याला शिक्षा होणारच याबाबतची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलीच आहे. तसेच अभिनेता सैफ अली यांच्यावर झालेल्या हल्ल्या संदर्भात पण गुरुवारी दिवसभर मुंबई पोलिस तपास यंत्रणा कामाला लागलेली होती. पोलिसांना थोडा वेळ दिला गेला पाहिजे. काय झालं, कोण आलं, कशासाठी आलं, कोणासाठी आलं या सगळ्यांची उत्तर पोलीस तपासातून समोर येणारच आहे. पटकन विरोधकांकडून सरकारवर टीका टिप्पणी करणे हे माझ्या मते योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी पण या संदर्भात आपली भूमिका मांडलेली आहे. पण या घटनेमुळे महाराष्ट्रात कुठेतरी भीतीचे वातावरण तयार करायचं आणि आता महाराष्ट्र सुरक्षित नाही, मुंबई सुरक्षित नाही असं म्हणणे योग्य नाही.

हेही वाचा >>> ॲट्रासिटी कायद्याचे उल्लंघन, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस

नवे महायुती सरकार मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ निवड पासून तर आता पालकमंत्री ठरविण्यात पण बराच उशीर करीत आहे. या प्रश्नाच्या उत्तरात चित्रा वाघ म्हणाल्या की हे तीन पक्षाचे महायुती सरकार आहे आणि यात सगळ्यांची समजूत काढून योग्य तो निर्णय घेण्यास त्यात सामंजस्य बसविण्यात उशीर होत असल्याचे पण योग्य वेळी योग्य बाब होत असल्याचे सांगितले तसेच २६ जानेवारी पूर्वी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पालकमंत्री बाबत निर्णय होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

विधानसभा निवडणुकी नंतर महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते पण फडणवीस सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेच दिले जात आहेत. माझ्या लाडक्या बहिणींना सांगणं आहे की फक्त एक दोन महिने यासंदर्भात वाट बघावी लवकरच त्यांच्या खात्यात २१०० रुपये पण येणार असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

महाविकास आघाडीच्या काळात मंत्री असलेल्या संजय राठोड प्रकरणात आपण खूप आक्रमक भूमिका घेतली होती पण आता तशी भूमिका आपण मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या राजीनामा बाबत घेत नाही या प्रश्नाच्या उत्तरात चित्रा वाघ म्हणाल्या की संजय राठोड चे प्रकरण   वेगळे होते  ते एका मुलीची प्रकरण होती. बीडची केस ही वेगळी केस आहे. बीड प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री स्वतः लक्ष देत आहेत सीआयडी एसआयटी  तपास  करीत आहे. आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे. संजय राठोड प्रकरणी महाविकास आघाडीचे उध्दव सरकार कुणाचे एकत नव्हते, काहीही बोलत नव्हते त्यामुळे मला आवाज बुलंद करणे गरजेचे वाटले त्यामुळे त्यावेळी मी ते केलं पण बीड प्रकरण हे वेगळं असल्याचे मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.

हळदी कुंकू कार्यक्रम

देवरी येथील भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियान आणि हळदीकुंकू कार्यक्रमात आपल्या संबोधनानंतर उपस्थित महिलांच्या आग्रहा खातर भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्ष आमदार चित्रा वाघ उखाणा घेत म्हणाल्या की…

‘इंग्रजीत वडिलाला म्हणतात फादर आणि आईला म्हणतात मदर.. ईश्वररावांचे नाव घेते सोडा माझा पदर…’

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla chitra wagh slams arvind kejriwal for targeting maharashtra government over saif ali khan attack sar 75 zws