वर्धा : सध्या नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वत्र विविध कार्यक्रमांस जोर चढला असून कलाकारमंडळीदेखील यात सहभागी होत असल्याचे दिसून येते. ठिकठिकाणी दांडिया, गरबा कार्यक्रमांचे आयोजन जोशात पार पडत आहे. मोठ्या संख्येने विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती या कार्यक्रमांना लाभत असल्याने राजकीय नेते ही संधी कशी सोडणार?
आर्वीतील राजकीय खडाजंगी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आहेच. प्रामुख्याने भाजपाचे आमदार दादाराव केचे आणि त्यांचे स्पर्धक म्हटल्या जाणारे सुमित वानखेडे यांनी गरबा कार्यक्रमांचे आयोजन त्यांच्या समर्थक मंडळांकडून केले. मात्र, ते दोघेही शेवटी पडद्यावर आलेच. या दोघांतील राजकीय वाद सर्वश्रुत आहेच. केचे यांनी वेळोवेळी टोमणे मारल्याने हा वाद उजेडात आलाच आहे.
हे ही वाचा…प्रेमाच्या त्रिकोणातून घात….. तरुणीनेच केली दुसऱ्या तरुणीची हत्या…प्रियकर मात्र….
दोन दिवसांपूर्वी दादाराव केचे यांच्या गरबा आयोजनात सुमित वानखेडे यांनी हजेरी लावली, तर मंगळवारी सुमित वानखेडे समर्थक मंडळात दादाराव केचे हजर झाले. यावेळी मात्र दादाराव केचेंची चांगलीच गोची झाली. कारण अभिनेता भारत गणेशपुरे याने सुमित वानखेडे यांची उमेदवारीच घोषित करून टाकली. त्यांनी जनतेला संबोधून विचारले की , यावेळी सुमित वानखेडे यांना निवडून देणार की नाही? त्यावर एकच जल्लोष झाला. सुमित वानखेडे यांनी केलेल्या कामांचा पाढा वाचायलाही गणेशपुरे विसरले नाही.
अद्याप कोणाचीच उमेदवारी जाहीर झाली नसतानाही जाहीर उच्चार कसा, असा प्रश्न सर्वांनाच पडला. यानंतर दादाराव केचे यांचेही भाषण झाले. त्यांनी मात्र गणेशपुरे यांच्या वक्तव्याचा उच्चार टाळला. असे आयोजन व्हायलाच पाहिजे, एवढेच ते बोलले. कटुता टाळली. कारण यापूर्वी त्यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते तेव्हा मुद्दाम सुमित वानखेडे यांना टाळल्यामुळे चांगलीच चर्चा झाली होती. पुढे तर लोकसभा निवडणुकीत दोघांचेही स्वतंत्र प्रचार कार्यालय होते. त्यातून स्पर्धा दिसून आलीच. आता हा प्रसंग अनेक शंका निर्माण करणारा ठरत आहे.
हे ही वाचा…भाजपच्या दिल्लीतील विजयी सभेतील गडकरींच्या अनुपस्थितीची चर्चा
सुमित वानखेडे यांच्या उमेदवारीचा जाहीर उच्चार व त्यावर दादाराव केचे यांनी बाळगलेले मौन राजकीय वर्तुळात चर्चेस पेव फुटणारे ठरत आहे. दादाराव केचे यांनी माघार तर घेतली नाही ना, असेही गंमतीत विचारल्या जात आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार असावा, यासाठी अन्यत्रप्रमाणेच येथेही पक्षांतर्गत निवडणूक झाली आहे. पदाधिकाऱ्यांनी मतदान पण केले. त्याचा अहवाल मुंबईत पोहचला आहे. पण त्यापूर्वीच भारत गणेशपुरे यांनी सुमित वानखेडे यांची उमेदवारी जाहीर केल्याने, हा अहवाल तर फुटला नाही ना, असा प्रश्न गंमतीत चर्चिला जात आहे.