अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या समर्थकांवर अतिशय खालच्या पातळीवर समाजमाध्यमातून टीका केल्याचा आरोप करीत मूर्तीजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे व एका वारकऱ्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. त्याची ध्वनिफीत समाज माध्यमात प्रसारित झाली आहे. या प्रकरणात आमदार हरीश पिंपळे यांनी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप वारकरी अर्जुन लोणारे यांनी केला आहे. तर अतिशय खालच्या पातळीवर टीका केल्याने जाब विचारल्याचे स्पष्टीकरण आ. पिंपळे यांनी दिले आहे.
या प्रकरणात पोलीस तक्रार देखील झाली. त्यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ‘व्हॉट्सॲप’वरील एका समूहावर चांगलाच वाद पेटला. या समूहावर वारकरी संप्रदायातून येणारे अर्जुन लोणारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या समर्थकांवर टीका केल्या व त्यासाठी काही अपशब्दांचा वापर केल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अर्जुन लोणारे यांनी मूर्तिजापूर शहरातील रस्त्याच्या दर्जावरून देखील प्रश्न उपस्थित करीत भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यामुळे संतप्त झालेले भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी भ्रमणध्वनीवरून अर्जुन लोणारे यांच्याशी संपर्क साधला. आमदार हरीश पिंपळे यांनी भ्रमणध्वनीवरून चर्चा करताना मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अर्जुन लोणारे यांनी केला आहे. दरम्यान, मूर्तिजापूरच्या पोलीस निरीक्षकांनी ठाण्यात बोलावून भाजप पदाधिकाऱ्यांची माफी मागा, तक्रार दाखल करणार नाही, असे सांगितली.
हेही वाचा…सरकारवर लोकांचा विश्वास नाही? स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात पुन्हा आंदोलन…
मात्र, माफी मागण्यास साफ नकार देऊन काय कारवाई करायची ते करा, असे म्हटल्याचे अर्जुन लोणारे यांनी सांगितले. या सर्व प्रकरणावर आमदार हरीश पिंपळे यांनी त्यांची बाजू मांडली आहे. अर्जुन लोणारे यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या समर्थकांवर टीका केली. त्यामुळे त्यांना भ्रमणध्वनीवरून जाब विचारला, असे आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले. या प्रकरणावरून आता चांगलाच वाद पेटल्याचे चित्र आहे.
अर्जुन लोणारे यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांवर टीका केली. त्यांची भाषा अतिशय वाईट होती. त्यामुळे फोन करून जाब विचारला आहे. यापूर्वी देखील त्यांनी असा खोडसाळपणा केला होता. – हरीश पिंपळे, आमदार, मूर्तिजापूर.
समाजमाध्यमातील एका समुहावर टीका केल्याने मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी मारण्याची धमकी दिली. पोलिसांमार्फत देखील दबाव आणण्याचा प्रयत्न केला. – अर्जुन लोणारे, मूर्तिजापूर.