वर्धा : भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी आर्वी मतदारसंघात दिलेला विकास निधी परत घेण्याची केलेली मागणी तेली समाजाचा रोष ओढवून घेणारी ठरली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रातून आ.केचे यांनी स्पष्ट नाराजी नोंदवली. त्यांच्या मतदारसंघात देण्यात आलेला १० कोटी रुपयाचा निधी कोणच्या शिफारसीने दिला, असा सवाल करत त्यांनी माझे पत्र नसतांना निधी दिलाच कसा असा जाब विचारला. फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांनी हा निधी आणल्याबद्दल केचे रोष व्यक्त करतात.

याच निधीत आर्वी येथे संताजी सभागृह बांधण्यासाठी एक कोटी रुपयाचा समावेश आहे. केचे यांची मागणी मान्य झाल्यास हा निधी सुध्दा परत जाणार. या शंकेपोटी तेली समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. तेली समाज संघटनेचे चंद्रशेखर श्रीराव यांनी केचे यांचा निषेध केला. संताजी सभागृहासाठी महाराष्ट्रात प्रथमच एक कोटी रुपयाचा निधी मिळाला आहे. मात्र आ.केचेंनी याचे श्रेय मिळत नाही म्हणून संपूर्ण निधीच रद्द करण्यासाठी आटापिटा चालविला आहे. समाजाने आर्वी मतदारसंघात मोठ्या प्रमाणत यांना मतदान केले. पण यांनी कोणताही निधी समाजासाठी दिला नाही.

हेही वाचा >>> नागपूर : लग्नानंतर सुनेला सासू-सासरे नकोसे!

आता निधी मंजूर झाला तर तोही रद्द करण्याची मागणी करीत आहे. त्यांचा समाज निषेध करतो. तर आर्वीचे माजी नगराध्यक्ष व भाजपनेते प्रशांत सव्वालाखे यांनी मिळालेल्या निधीचे स्वागतच केले पाहिजे असे मत व्यक्त केले. समाज भवनासाठी प्रथमच एवढा मोठा निधी मिळाला. समाजाने भाजपला भरभरून साथ दिली. म्हणून आमदारांनी मिळालेल्या निधीबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी. त्यांनाही याचे श्रेय मिळणारच, असे सव्वालाखे म्हणाले. तैलीक युवा समाज संघटनेचे विपिन पिसे यांनी आ.केचे यांनी केलेल्या मागणीबाबत मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया आल्याचे नमूद केले.

Story img Loader