चंद्रपूर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीत एका जागेसाठी ४० लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोप भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण भरती प्रक्रियाच संशयास्पद आहे असेही म्हटले आहे. दरम्यान परीक्षा सुरू असताना संगणकात एकच प्रश्न व उत्तर अनेक वेळा येत असल्याने तसेच तांत्रिक बिघाडाने विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत परीक्षा बंद पडली आहे. तसेच नारेबाजी सुरू केली आहे. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक २६१ व शिपाई ९७ अशा एकूण ३५८ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आली आहे. २१, २२ व २३ डिसेंबर रोजी या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा सुरू असताना येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात चुकीचे प्रश्न दिल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला आहे. राज्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर ऑनलाईन संगणक सर्वर डाऊन झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर येत गोंधळ घालून परीक्षा बंद पाडली आहे. तसेच अनेक विद्यार्थी चंद्रपूर बँकेत फोन करून याबाबतची माहिती देत आहेत. मात्र बँकेकडून कोणीही फोन घेऊन उत्तर देत नसल्याने विद्यार्थी आणखीच संतापले आहेत. दरम्यान अशातच आता विधानसभेत आमदार किशोर जोरगेवार यांनी या भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे. एकूण ३५८ पदांसाठी ही भरती सुरू आहे. बँकेच्या वर्तुळातून काही दलालांनी तीन ते चार दिवसांपासून उमेदवारांना फोन केले. एका जागेसाठी ४० लाख रुपये मागत असल्याचा आरोप केला आहे. आमदार जोरगेवार औचित्याच्या विषयात प्रश्न करताना विधानसभा अध्यक्ष यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. तसेच परीक्षा प्रक्रियेत देखील घोळ असल्याचे म्हटले आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून ३१ हजार १५६ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज आले आहेत. ही परीक्षा राज्यातील नऊ जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर सुरू आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्हा बँकेची परीक्षा चंद्रपूर जिल्ह्यात घेण्यात यावी, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नांदेड व जालना जिल्ह्यांचा काय संबंध असा प्रश्न आमदार जोरगेवार यांनी उपस्थित केला आहेत.
हेही वाचा : संजय राऊत रेकीवर मंत्री नितेश राणे यांचे मोठे विधान…म्हणाले मच्छर…
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती प्रक्रिया मागील अनेक वर्षापासून विविध कारणांनी गाजत आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात तर सरकार खात्याने व स्वत: मुख्यमंत्र्यांनी या नोकर भरतीला स्थगिती दिली होती. मात्र नागपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा बँकेच्या नोकर भरतीत राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असा निकाल देत नोकर भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठविली होती. बँकेने मुंबई येथील आयटीआय लिमिटेड या कंपनीला ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी करारबध्द केले आहे. विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, अमरावती व गोंदिया या चार जिल्ह्यासोबतच पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, नांदेड या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आहेत. नागपूरात १४, पुणे ८ तर नाशिक येथे ७ तर नांदेड येथे एक परीक्षा केंद्र आहे. इतर सर्व जिल्ह्यात दोन परीक्षा केंद्र देण्यात आलेली आहेत अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी दिली.
आजचा पहिल्या सत्रातील पेपर रद्द
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज पहिल्या पेपरला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने आजचा पेपर रद्द करण्यात आला आहे असे बँकेच्या वतीने कळविण्यात आले आहे. दरम्यान सर्वच परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरती नमनालाचपुढे ढकलण्याची नामुष्की बँकेवर ओढवली आहे. आज शनिवारी नागपूर व अन्य केंद्रावरील परीक्षे दरम्यान तांत्रिक चुकीचा फटका परीक्षार्थींना बसला. चंद्रपूर व ग्रामीण भागातून कालपासून परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या उमेदवारांना परीक्षा सुरु होताच पुढे ढकलत असल्याचा संदेश देण्याची पाळी परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेवर आली. यामुळे उमेदवारांना आर्थिक, मानसिक ताण सहन करावा लागतो आहे. बँक चंद्रपूर जिल्ह्यातील. परीक्षा नागपूर, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद केंद्रावर. आधीच नियोजन चुकीचे आणि आता पहिल्या सत्राचा पेपर रद्द केला आहे असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी सांगितले. दरम्यान आज दुपारच्या सत्रातील व २२ आणि २३ डिसेंबर चे पेपर होणार आहेत. तसेच आजचा रद्द आलेला पेपर २३ रोजी होणार आहे अशीही माहिती त्यांनी दिली.