नागपूर : औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांच्या तरुणांमध्ये जोरदार राडा झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर समाजकंटकांनी विविध भागात जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दगडफेकीत १५ पोलीस जखमी झाले आहेत. त्यानंतर आता नागपुरातील काही भागात पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड केली, काही वाहन पेटवून देण्याचे प्रकार घडले. भाजपचे स्थानिक आमदार प्रवीण दटके यांनी या दंगलीबाबत मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करीत आत्तापर्यंत सुमारे ४६ जणांना ताब्यात घेतले आहे. आता नागपुरात संचारबंदी लावण्यात आली आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. महाल परिसरात तगडा बंदोबस्त आहे. काही जणांनी पोलिसांवरही हल्ला केला आहे. या हल्लात एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि ८ ते १० पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे ४ कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नागपूरचे पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.
आ. दटके नेमके काय म्हणाले?
नागपूरच्या महल परिसरातील घरे आणि वाहने जाळण्याबाबत आमदार प्रवीण दटके मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, बाहेरुन आलेल्या काही व्यक्तींनी घरांना आणि वाहनांना आग लावली. सकाळी याविरोधात आंदोलन करण्यात आले, पोलिसांनी हस्तक्षेप करुन संतप्त नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. रात्री महल परिसरात दगडफेक करण्यात आली. वाहनांची जाळपोळ करण्यात आली. हंसरपुरी येथे झालेल्या हिंसाचारात बाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की , आमच्या परिसरात काही समाजकटंक आले होते त्यांनी हा प्रकार केला आहे. एक टोळी आली होती त्यांच्या चेहरा रुमालाने झाकलेला होता. त्यांच्या हाताता धारदार हत्यारे होती. त्यांनी परिसरात गोंधळ केला. घरे, दुकाने,वाहनांवर दगडफेक केली.