बुलढाणा : कुणी प्रचार करो वा ना करो, अमरावती मतदारसंघामध्ये खासदार नवनीत राणा याच निवडून येतील, असा दावा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे यांनी केला आहे. ‘आत’ राहायचे की ‘बाहेर’ पडायचे हा आमदार बच्चू कडू यांचा वैय्यक्तिक विषय असल्याचे रोखठोक प्रतिपादनही त्यांनी केले.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव मतदारसंघाचे आमदार कुटे हे लोकसभा निवडणुकीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी शहरात आले होते. यावेळी प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी नवनीत राणा यांच्या विजयाचा दावा केला. महायुतीत कोणतीही खदखद नसल्याचे सांगून अमरावतीत खासदार राणा या भाजपातर्फे लढत आहेत. त्या कमळ चिन्हावर लढत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना चाहणारा मतदार वर्ग त्यांनाच मतदान करणार आहे. याशिवाय मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी तेथील पदाधिकारी, कार्यकर्ते प्राणपणाने त्यांचा प्रचार करणार आहेत.
हेही वाचा…वाशीम : सर्वेक्षण पथकाच्या तपासणीत ३६ लाखाची रोकड जप्त; २० लाख संशयास्पद, आयकर विभागाकडून चौकशी
सत्ताधारी गटाचे आमदार बच्चू कडू यांनी उमेदवार दिल्यावरून विचारणा केली असता, तो त्यांचा प्रश्न आहे. आत रहायचे की बाहेर पडायचे हा त्यांचा विषय आहे. मात्र त्यामुळे निकालावर काही परिणाम होणार नसून नवनीत राणा याच विजयी होणार, हे निश्चित आहे, असा दावा कुटे यांनी केला.
हेही वाचा…‘‘नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल भाजपला ठाऊक आहे का?’’ सुषमा अंधारेचं टीकास्र
आता राज्यातील जनतेनेच मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कुणी काम करो वा ना करो, कुणी आत राहो की बाहेर पडो, नवनीत राणाच विजयी होणार, कारण त्या मोदींच्या उमेदवार आहेत, असेही ते म्हणाले. राज्यात महायुतीला ४५ पेक्षा अधिकत जागा मिळतील, असा दावा त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केला.