लोकसत्ता टीम
नागपूर : काँग्रेसद्वारा नागपुरात काढण्यात आलेली सद्भावना यात्रा सनातन धर्माचा अपमान करणारी आहे. , अशी टीका भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे.
दंगल झाली त्या दिवशी काँग्रेसचा एकही नेता भटकला नाही. दंगेखोरांनी लोकांची घरे जाळली, दगडफेक केली, घरात शिरून मारहाण केली. पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, पोलीस उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यावेळी हे काँग्रेसचे नेते कुंभकर्णी झोप घेत होते. झालेल्या दंगलीत काँग्रेसच्या भूमिकेवर शंका निर्माण होत असून ती घडवण्यामागे काँग्रेसच्या नेत्याची भूमिका होती, असा आरोप खोपडे यांनी केला.
काँग्रेस नेत्यांनी नागपूर दंगलीचा अहवाल राज्यपालांना दिला होता. तो सार्वजनिक कराया, अशी मागणी खोपडे यांनी केली. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे व समितीने कसल्याही प्रकारचा दौरा न करता, एकही व्यक्तीच्या घरी न जाता अहवाल तयार केला. कॉंग्रेसच्या एका नेत्याच्या घरी बसून रिपोर्ट तयार करण्यात आला. सनातन धर्माला बदनाम करण्याचा अहवाल राज्यपाल महोदयांकडे सादर करण्यात आला. काँग्रेसनी हा रिपोर्ट सार्वजनिक करावा.
काँग्रेसची सद्भावना रैली वोट बँकसाठी काढली काँग्रेसला दंगलीची चिंता नाही, सनातन धर्मावर झालेल्या हल्ल्याची चिंता नाही तर वोट बँकेची चिंता आहे. मुस्लिम समुदायाला सहानुभूती दाखविण्याकरिता ही सद्भावना रैली होती, असे स्पष्ट दिसून येते, असे खोपडे म्हणाले.
हे मगरीचे अश्रू- आ. प्रवीण दटके
औरंगजेबाची कबर हटवण्याकरिता नागपुरात झालेल्या आंदोलनाचा आधार घेऊन शहरातील काही समाजकंटकांकडून तरुणांची माथी भडकवण्यात आली. या दंगेखोरांमुळे शांत असणाऱ्या नागपुरात दंगलीची दुर्दैवी घटना घडली .ही घटना घडल्यानंतर तातडीने शांतता प्रस्थापित करण्याची गरज असताना काँग्रेसचा एकही नेता त्यावेळी पुढे आला नाही , परंतु दंगलीला एक महिना पूर्ण होत असताना काँग्रेसला जाग आली.
सद्भावना रॅली काढून राजकीय पोळी भाजून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसचे नेते करत आहेत . या दंगलीमध्ये ज्या सामान्य नागरिकांच्या वाहनांचे , दुकानांचे आणि घरांचे कोट्यावधीचे नुकसान झाले, त्यांच्याबद्दल एकही शब्द काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला नाही. सद्भावना रॅली काढण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे मगरीचे अश्रू आहे, अशी टीका भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केली.
हा तर सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न : संदीप जोशी
नागपुरातील हिंसाचाराचे प्रकरण शासनाने आणि पोलिसांनी योग्यरीत्या हाताळले. शांती आणि सौहार्द ही नागपूरची परंपरा असल्याचे श्री रामनवमी शोभायात्रेने दाखवून दिले. असे असताना काँग्रेस काढत असलेली सद्भावना यात्रा हा निव्वळ एक फार्स असून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघात आमदार संदीप जोशी यांनी केला.
नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज नागपुरात सद्भावना यात्रा काढली, ज्याची या क्षणी काहीही गरज नव्हती. हिंसाचाराची घटना घडल्यानंतर नागपूर पोलिसांनी आणि महाराष्ट्र सरकारने तात्काळ योग्य ती कारवाई केली आणि आज नागपूर शहर पुन्हा शांततेकडे परतले आहे. रामजन्मोत्सवाच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून करण्यात आलेल्या स्वागताने आणि पुष्पवृष्टीने समाजात ऐक्य आणि सौहार्दाचे उदाहरण साऱ्यांसमोर उभे केले. अशा स्थितीत, नागपूरमध्ये कोणताही तणाव नसताना काँग्रेसकडून ‘सद्भावना रॅली’च्या नावाखाली सामाजिक सलोखा बिघडवण्याचा आणि दोन समाजात भेदभाव निर्माण करण्याचा उघडपणे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप आमदार संदीप जोशी यांनी केला.
हा प्रकार केवळ राजकीय लाभासाठी केलेला पोकळ आणि धूर्त प्रकार आहे. नागपूरकरांनी याचा तीव्र निषेध करावा आणि कोणत्याही अशा सापळ्याला बळी न पडता शांतता आणि ऐक्याचे जतन करावे. काँग्रेसने समाजात फूट पाडणं थांबवावं, अन्यथा जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.