बुलढाणा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवून दिल्याच्या धमकी दिल्याप्रकरणी जलदगतीने कारवाई करण्यात आली. या बातम्या झळकत असतानाच चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनाही ठार मारण्याची धमकी देणारे पत्र आल्याची माहिती समोर आले. यामुळे जिल्ह्यातील चिखली आणि सिंदखेड राजा मतदारसंघाने राज्याचे लक्ष वेधले.या पार्श्वभूमीवर चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्या धमकी पत्रात नेमके काय मजकूर आहे, याबद्दल चिखली, बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात उत्सुकता निर्माण झाली. दरम्यान, या गंभीर धमकी पत्रासंदर्भात आमदार श्वेता महाले यांनी आज संध्याकाळी चिखली पोलीस ठाण्यात रितसर लेखी तक्रार दिली. स्वतःच्या ‘लेटर पॅड’वर त्यांनी ही तक्रार दिली आहे. यातून आमदार महाले यांनी अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा केला आहे.

आज दुपारी प्रारंभी केवळ एक धमकी पत्राची चर्चा झाली. मात्र आमदारानी दिलेल्या तक्रारीत एकाच (खाकी रंगाच्या) लिफाफ्यातून एक नव्हे तर तीन धमकीची पत्रे आल्याचे उघड झाले आहे. पत्रांचा मजकूर जहाल भाषेत आहे. एकाच पाकिटातून पाठविलेले हे तीन पत्र वेगवेगळ्या प्रकाराच्या कागदावर आणि वेगवेगळ्या अक्षरात लिहिलेली आहेत. ‘शीर धडापासून वेगळे करू, सर तन से जुदा, नरड्याचा घोट घेऊ, जिवंत सोडणार नाही,’ असे शब्द प्रयोग यात करण्यात आले आहे.

पत्र बुलढाणा डाक कार्यालयातून !

तीन वेगवेगळी पत्र असलेला हा लिफाफा बुलढाणा येथील डाक कार्यालयातून पाठविण्यात आल्याची धक्कादायक माहिती आमदार श्वेता महाले यांनी चिखली पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीतून दिली आहे. आपण मतदारसंघात दौऱ्यावर असताना दुपारी हा लिफाफा आपल्या चिखलीस्थित जनसंपर्क कार्यालयात आला. आपण दौऱ्यावरून परत आल्यावर तो उघडून पहिला असता त्यात तीन पत्र आढळून आले. आपण आमदारकीच्या पहिल्या काळात भरपूर विकासकामे केलीत, जात धर्म न पाळता विकासकामे केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपण दुसऱ्यांदा निवडून आल्याने राजकीय विरोधकांचा जळफळाट झाला आहे. निवडून आल्यावर मागील डिसेंबर महिन्यात चिखली शहर परिसरातील काही बेकायदा अतिक्रमणे काढण्यात आली. शासन आणि चिखली पालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. यात कोणताही जाती धर्म भेद न करता कारवाई झाली असताना देखील विशिष्ट समुदायच्या व्यक्तींनी ही कारवाई पक्षपाती असल्याचा प्रचार केला. माझ्या राजकीय विरोधकांनी याला पाठबळ दिले, असे आमदार श्वेता महाले यांनी तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणी कारवाई करण्याची मागणी चिखली ठाणेदार व वरिष्ठाना करण्यात आली आहे.

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांचा बुरखा फाटायलाच हवा

चिखली मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमी सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन विकासकार्य करण्याची भूमिका ठेवली आहे. यामध्ये कुठलाही भेदभाव माझ्याकडून आजवर झालेला नाही. परंतु, विकासाची ही प्रक्रिया पाहून काही लोकांच्या पोटात पोटशुळ उठत आहे. त्यामुळे विनाकारण शासकीय कामकाजाला धार्मिक स्वरूप देण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी चालवला असून माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने व धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने हे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार श्वेता महाले म्हणाल्या. आपल्याला आलेल्या धमकीच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण माहिती दिली असून संबंधित समाजकंटक व्यक्तीचा बुरखा फाटलाच पाहिजे व चौकशीतून सत्य समोर आले पाहिजे या उद्देशाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत असल्याचे त्या म्हणाल्या.

Story img Loader