नागपूर : नागपूर महापालिका शाळांमधील कमी होत चाललेल्या विद्यार्थी संख्येचा मुद्दा बुधवारी पावसाळी अधिवेशनात गाजला. भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी विधान परिषदेत या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधून काही उपाय सूचविले.सरकारच्यावतीने त्याची नोंदही घेण्यात आली. दोन दशकापूर्वी नागपूर महापालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या ७२ हजाराहून अधिक होती. मात्र त्यानंतर खासगी शाळांचे स्तोम वाढले, इंग्रजी शिक्षणाकडे पालकांचा कल वाढला आणि महापालिकेतील शाळेतील शिक्षणाचा दर्जाही घसरू लागला. याचा परिणाम शाळेच्या पटसंख्येवर होऊ लागला व सध्या ही संख्या ७२ हजाराहून २२ हजारापर्यंत आली आहे. मधल्या काळात तत्कालीन आयुक्तांनी काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महापालिकेच्यावतीने सहा शाळा सुरू केल्या. या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याने तेथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांचे पालक गर्दी करीत असतात. असाच प्रयोग इतर शाळांमध्ये राबवण्याची सूचना दटके यांनी केली. ते म्हणाले. नागपूरमधील स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबवलेला प्रयोग यशस्वी ठरला आहे. विद्यार्थी मिळत नसल्याने शाळा बंद होत आहेत, शिक्षक अतिरिक्त ठरत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरचा प्रयोग राज्यातील इतरही महापालिकेत राबवण्याबाबत शासन परवानगी देणार का? असा प्रश्न दटके यांनी केला. या प्रश्नावर शासनाकडून उत्तर देताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, शासनाचे धोरण शाळांमध्ये सेमी इंग्लिश सुरू करण्याचे आहे. किमान केंद्रस्तरावर एकतरी शाळेत शासन सेमी इंग्लिश सुरू करणार आहे. महापालिकेला स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून सेमी इंग्लिश शाळा सुरू करण्याला परवानगी देण्याबाबत शासन सखोल अभ्यास करेल व त्यानंतर याबाबत निर्णय घेतलता जाईल.
हेही वाचा : ‘लाडक्या बहिणीं’ची लूट, अकोल्यात तलाठी निलंबित; दाखला वितरणात गैरव्यवहार…
नागपूर शहरातील महापालिकेच्या शाळांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. काही शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या असल्याने त्या बंद पडल्या आहेत. त्याचा वापर इतर कामांसाठी केला जातो. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव आहे. शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त इतर कामे करावी लागत असल्याने अनेक शिक्षक शाळेत कमी आणि अन्य कामांकडेच अधिक लक्ष देतात. याचाही परिणाम महापालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा घसरण्यावर झाला आहे. राजकीय हस्ताक्षेपाचाही परिणाम शाळेवर झालेला आहे. महापालिकेच्या काही शाळा शहराच्या महत्वाच्या ठिकाणी आहे. त्या जागेवर खासगी संस्थांचा डोळा आहे. शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढावी म्हणून महापालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या योजना राबवल्या जातात. मोफत सायकल , पोशाख वाटप आदीचा त्यात समावेश आहे. त्यानंतरही विद्यार्थी महापालिकेच्या शाळेकडे वळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.