नागपूर : नागपूर महापालिका शाळांमधील कमी होत चाललेल्या विद्यार्थी संख्येचा मुद्दा बुधवारी पावसाळी अधिवेशनात गाजला. भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी विधान परिषदेत या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधून काही उपाय सूचविले.सरकारच्यावतीने त्याची नोंदही घेण्यात आली. दोन दशकापूर्वी नागपूर महापालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या ७२ हजाराहून अधिक होती. मात्र त्यानंतर खासगी शाळांचे स्तोम वाढले, इंग्रजी शिक्षणाकडे पालकांचा कल वाढला आणि महापालिकेतील शाळेतील शिक्षणाचा दर्जाही घसरू लागला. याचा परिणाम शाळेच्या पटसंख्येवर होऊ लागला व सध्या ही संख्या ७२ हजाराहून २२ हजारापर्यंत आली आहे. मधल्या काळात तत्कालीन आयुक्तांनी काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महापालिकेच्यावतीने सहा शाळा सुरू केल्या. या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याने तेथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांचे पालक गर्दी करीत असतात. असाच प्रयोग इतर शाळांमध्ये राबवण्याची सूचना दटके यांनी केली. ते म्हणाले. नागपूरमधील स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबवलेला प्रयोग यशस्वी ठरला आहे. विद्यार्थी मिळत नसल्याने शाळा बंद होत आहेत, शिक्षक अतिरिक्त ठरत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरचा प्रयोग राज्यातील इतरही महापालिकेत राबवण्याबाबत शासन परवानगी देणार का? असा प्रश्न दटके यांनी केला. या प्रश्नावर शासनाकडून उत्तर देताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, शासनाचे धोरण शाळांमध्ये सेमी इंग्लिश सुरू करण्याचे आहे. किमान केंद्रस्तरावर एकतरी शाळेत शासन सेमी इंग्लिश सुरू करणार आहे. महापालिकेला स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून सेमी इंग्लिश शाळा सुरू करण्याला परवानगी देण्याबाबत शासन सखोल अभ्यास करेल व त्यानंतर याबाबत निर्णय घेतलता जाईल.

हेही वाचा : ‘लाडक्या बहिणीं’ची लूट, अकोल्यात तलाठी निलंबित; दाखला वितरणात गैरव्यवहार…

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mlc pravin datke on decline in student numbers in nagpur municipal corporation schools cwb 76 css
First published on: 03-07-2024 at 19:18 IST