वर्धा : एकीकडे भाजपाचेच काही समर्थक गांधी हत्या करणाऱ्या नाथुरमचे उघड गोडवे गात असताना राज्यातील भाजपाचे शिर्षस्थ नेते गांधी जयंतीस सेवाग्राम येथे धूळ झाडणार आहेत. भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेचा आरंभ या दिवशी सेवाग्राम बापुकुटीत नतमस्तक होत केल्या जाणार असल्याचे पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रभारी असलेले माजी आमदार डॉ. आशिष देशमुख सूचित करीत आहे.
बापुकुटी, सेवाग्राम येथे सकाळी १०.०० वाजता नतमस्तक होऊन तसेच त्यानंतर हिंगणघाटच्या पारडी गावाजवळ ओबीसी समाजाच्या सर्व घटकांचा भव्य मेळावा आयोजित करून या यात्रेचा खऱ्या अर्थाने शुभारंभ होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतराव कराड, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. ही यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील ११ ही जिल्हे पादाक्रांत करेल. पहिल्या टप्प्याचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी, जि. वाशीम येथे होईल.
हेही वाचा – नागपूर : फुटाळा तलावालाही धोका, ३५० कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव
हेही वाचा – गोंडवाना विद्यापीठाला राष्ट्रीय पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते गडचिरोलीचा सन्मान
ओबीसी जागर यात्रेची सुरुवात हिंगणघाटपासून होत असून यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, रामटेक, काटोल, अकोला, शेगाव, वाशीम असा या यात्रेचा मार्ग राहील. नवरात्रीनंतर उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा सुरू राहील. भाजपा सत्तेत असून राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या हितासाठी ज्या योजना राबविल्यात आणि जे कार्य केले, त्याबद्दल ओबीसी समाजाला माहिती मिळावी, हा या ओबीसी जागर यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. जनतेने मोठ्या प्रमाणात या यात्रेत सहभागी व्हावे आणि ओबीसींचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.