नागपूर : भाजपच्या ज्या उमेदवारांनी नामांकन अर्ज भरले आहे त्यातील अनेकांनी पक्षश्रेष्ठीजवळ भावना व्यक्त करुन अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे मात्र जे अर्ज मागे घेणार नाही त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाईल. शिवाय महायुतीअंतर्गत असलेली बंडखोरी संपविण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. दोन दिवसांपूर्वी या विषयावर महायुतीची बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील निवडणूक संचालन समितीची बैठकीत होती, जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सूचना दिल्या आहेत, एका ठिकाणी एकच उमेदवार निवडणूक लढू शकणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार आहे त्या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नामांकन दाखल केले असेल तर त्यांनी ते मागे घ्यावे अन्यथा पक्षाकडून कारवाई केली जाईल. पक्ष हा आईसारखा आहे. त्यामुळे पक्षावर श्रद्धा ठेवून काम करावे, पक्ष सर्वांचे भले करेल असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा – धानोरकर कुटुंबात फूट, खासदार धानोरकर लाडक्या भावाच्या पाठीशी, भासरे अनिल धानोरकर ‘वंचित’

राज ठाकरे यांनी त्यांची व्यक्तिगत भूमिका मांडली आहे आणि त्यांना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे यांच्या भावना सुरुवातीपासून भाजपसोबत आहेत, त्यामुळे ते आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागतच करणार, असेही बावनकुळे म्हणाले. मनोज जरागे यांचे आंदोलन हे सामाजिक आंदोलन आहे, या सामाजिक आंदोलनाला राजकारणाशी जोडू नये. सत्तेमधून समाजाला न्याय मिळतो. आमचे सरकार सर्वांनाच न्याय देत असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी एखादवेळी वेगळ्या भूमिका घेतल्या मात्र राज्याच्या पुढच्या विकासाच्या दृष्टीने ते आमच्यासोबत आहेत, असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा – अमरावती : कर्मचाऱ्यांसाठी निवडणुकीचे काम नावडते! ड्युटी रद्द करण्‍यासाठी ८२० अर्ज

महाविकास आघाडीचा अजेंडा काय हे ठरले नाही. केवळ टोमणे लगावणे हा एकच त्यांचा कार्यक्रम आहे. विशेषत: सकाळचे टोमणे बंद करा, आता कोणी ऐकत नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा एजंडा काय आहे? ते जनतेला काय देणार आहे हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान आघाडीला दिले आहे. राजू पारवे यांच्याशी माझे आणि फडणवीसांचे बोलणे झाले आहे ते आपला नामांकन अर्ज मागे घेतील, असा विश्वास आहे. राजेंद्र मुळक बंडखोरी करत आहेत. चेन्निथला यांना हे दिसत नाही काय? काँग्रेस उद्धव ठाकरेंना फसवत असून हिंदुत्वापासून त्यांना ते दूर घेऊन गेले आहे, अशी टीका त्यांनी केली. कामठी मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत, पूर्ण जनता माझ्या पाठीशी राहील, मी मतांचे कर्ज मागतो आहे आणि ते कर्ज इमानदारीने काम करून पूर्ण फेडणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले.