नागपूर : मुंबई महापालिकेच्या कूपर-भगवती रुग्णालयातील २०० कोटींच्या घोटाळा प्रकरणाचे विधान परिषदेत पडसाद उमटले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माहिती घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतरही भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी चौकशी करण्याच्या मागणीसाठी गोंधळ घातला. त्यावरून सभापती निलम गोऱ्हे यांनी दरेकर व लाड यांना तुम्ही विरोधी पक्षात आहात का, असा प्रश्न केला.
मुंबई महापालिकेच्या कूपर आणि भगवती रुग्णालयातील दोनशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली. या घोटाळा प्रकरणात कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप दरेकर व लाड यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी करू, असे सांगताच दरेकर व लाड यांनी उभे राहून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
हेही वाचा: नागपूर: डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, तुम्ही आता मारामारी करणार का?
त्यावेळी सभापती निलम गोऱ्हे यांनी दोघांनाही खडे बोल सुनावले. तसेच तुम्ही विरोधी पक्षात आहात का, असा प्रश्न त्यांना केला. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या बोरिवली येथील भगवती रुग्णालय तसेच कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाला पुढील दोन महिन्यांत तात्काळ निधी दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिले.