नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणणाऱ्या नागपूर सुधार प्रन्यास भूखंड घोटाळ्यावर चर्चेला सत्ताधारी पक्ष तयार नसतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व प्रवीण दटके यांचा याच मुद्यावरील तारांकित प्रश्न प्रश्नाेत्तराच्या पुस्तिकेत समाविष्ट असल्याने शिवसेनेने (ठाकरे गट) विधान परिषदेत सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ह प्रश्न सभागृहात चर्चेला आला नाही,पण त्या माध्यमातून झालेल्या आरोप-प्रत्यारोंपामुळे तो चांगलाच गाजला.
एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना १६ भूखंडांचे वाटप केले होते. त्यावर न्यायालयाने आक्षेप घेतल्यानंतर शिंदे सरकारने ते भूखंड वाटप रद्द केले. गुरुवारी तसे न्यायालयालाही कळवण्यात आले. मात्र गेल्या दोन दिवसांपासून हा मुद्दा विधिमंडळात सातत्याने गाजत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे या मुद्यावर चर्चेसाठी आग्रही असताना प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर चर्चा होऊ शकत नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले होते. हीच भूमिका त्यांनी विधानसभेतही मांडली होती.
गुरुवारी शिवसेनेने अनपेक्षितपणे हा मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
त्याला कारणीभूत ठरला तो प्रश्नोत्तराच्या पुस्तिकेत असलेला व भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके यांनी उपस्थित केलेला भूखंड वाटपातील गैरव्यवहाराबाबतचा तारांकित प्रश्न. प्रश्नांच्या क्रमवारीनुसार तो मागे असल्याने एक तासाच्या प्रश्नोत्तरच्या तासात त्यावर चर्चा होणे अपेक्षित नव्हते. ही बाब हेरून शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य अनिल परब यांनी या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ज्या प्रश्नांवर चर्चा होऊ शकली नाही व तो महत्वाचा असेल तर त्यावर वेगळ्या सांसदीय आयुधाच्या माध्यमातून स्वतंत्र चर्चा उपस्थित करता येते. त्यामुळे बावनकुळे व दटके यांच्या तारांकित प्रश्नावर वेगळी चर्चा घ्यावी, अशी मागणी परब यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली.
परब यांचा हेतू लक्षात येताच सभागृहात उपस्थित बावनकुळेंनी लगेच यावर खुलासा करीत हा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील नासुप्र गैरव्यवहाराशी संबधित असल्याचे व त्याचा सध्याच्या शिंदेंच्या भूखंड वाटपाशी संबध नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर फडणवीस यांनी निवेदन करताना यासंदर्भातील आयुधानुसार चर्चेची तयारी दर्शवली.
हेही वाचा: सत्ताधारी सदस्यांना ‘क्लीन चिट’, विरोधी पक्षाच्या मागे चौकशीचा बडगा; अजित पवार यांचा आरोप
यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वेगळ्या आयुधानुसार चर्चा देता येईल,असे सांगितले व यावरील चर्चा येथेच संपली. मात्र शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत चर्चेला न आलेल्या बावनकुळेंच्या याच तारांकित प्रश्नाचा आधार घेऊन एकनाथ शिंदे यांना पदावरून खाली खेचण्यासाठी हा सगळा डाव भाजपानेच रचल्याचा आरोप केला. त्यामुळे चर्चा न झालेला प्रश्न अचानकं चर्चेत आला आहे.