अकोला : ‘भाजपच अकोला जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गट चालवतो. जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या इशाऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे कार्य सुरू असते,’ असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. दरम्यान, या प्रकरणात वंचितसोबतच्या आघाडीचे वरून आदेश आल्यास त्यांना पूर्ण सहकार्य राहील, अशी भूमिका शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात वंचित बहुजन आघाडी व शिवसेना ठाकरे गटामध्ये आघाडी आहे. या राजकीय पक्षांमध्ये राज्यात मैत्री असली तरी जिल्ह्यात स्थानिक नेत्यांकडून मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्याचे नेहमीच प्रयत्न केले जातात. याचा प्रत्यय अकोला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आला. जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा वंचित आघाडीचा गड म्हणून ओळखला जातो. गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून जिल्हा परिषदेवर वंचितची सत्ता आहे. भाजपच्या भूमिकेमुळे वंचितची सत्ता अबाधित राहिली, तर शिवसेना ठाकरे गट विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत.

हेही वाचा >>> “निवडणूक आयोगाचा पेपर फुटला”, सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या, “मला भीती वाटतेय, काही तरी गोलमाल…”

जि.प.च्या सर्वसाधारण सभेत शिवसेना ठाकरे गटाने राज्यातील वंचित सोबतची आघाडी विसरत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारी वंचितला अडचणीत आणले. हाता येथील जिल्हा परिषदेची शेतजमीन वहितीसाठी अत्यल्प दरात दिल्याचा मुद्दा शिवसेनेचे गटनेता गोपाल दातकर यांनी आक्रमकपणे उपस्थित केला. या प्रकरणावरून शिवसेना व वंचितमध्ये खडाजंगी झाली. वंचित व शिवसेनेच्या राज्यातील मैत्रीला ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यातच सुरुंग लागला आहे.

हेही वाचा >>> “प्रियंका गांधी महाराष्‍ट्रातून निवडणूक लढल्‍यास आनंदच”, यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या, “अमरावती मतदार संघ जर…”

या प्रकारावरून ॲड. प्रकाश आंबेडकरांनी थेट शिवसेना ठाकरे गटावरच निशाणा साधला. ते म्हणाले, ‘‘शिवसेना ठाकरे गटासोबत राज्यात आमची आघाडी आहे. अकोला जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गट भाजपच चालवते. त्यामुळे ते आम्हाला विरोध करतात. भाजपच्या एका आमदारांच्या इशाऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे कार्य सुरू असते. याची कदाचित उद्धव ठाकरेंना कल्पना नसेल.’’ ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या आरोपानंतर वंचित व शिवसेनेतील वादाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात भाजपला शिवसेना ठाकरे गटाकडूनच सर्वाधिक विरोध केला जातो. जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना बजावते. आघाडी संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून आदेश आल्यास वंचित आघाडीला आमचे पूर्ण सहकार्य राहील. – नितीन देशमुख, आमदार, शिवसेना ठाकरे गट

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp runs akola district shiv sena thackeray group prakash ambedkar allegation ppd 88 ysh
Show comments