अमरावती : भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर राणा दाम्‍पत्‍याने आनंदराव अडसूळ यांच्‍या येथील निवासस्‍थानी पोहचून त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची भेट घेत मनधरणी करण्‍याचा प्रयत्‍न केला. कार्यकर्त्‍यांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्‍याचे अभिजीत अडसूळ यांनी स्‍पष्‍ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीतील घटक असूनही आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ यांनी नवनीत राणा यांना तीव्र विरोध दर्शविला होता. अडसूळ आणि राणा यांच्‍यात गेल्‍या दशकभरापासून संघर्ष सुरू आहे. अडसूळ यांनीच नवनीत राणा यांच्‍या विरोधात जात प्रमाणपत्र प्रकरणी न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने नुकताच निकाल दिला आहे.

हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामटेकच्या प्रचारासाठी तळ का ठोकला?

काय म्हणाले अभिजीत अडसूळ ?

दरम्‍यान, नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे बुधवारी सकाळी अभिजीत अडसूळ यांची भेट घेण्‍यासाठी त्‍यांच्‍या निवासस्‍थानी पोहचले. त्‍यावेळी आनंदराव अडसूळ हे उपस्थित नव्‍हते. अभिजीत अडसूळ आणि त्‍यांच्‍या पत्‍नीने राणा दाम्‍पत्‍याचे स्‍वागत केले. त्‍यांच्‍यात काही काळ चर्चाही झाली.

हेही वाचा…“बायको परत मिळवून द्या, फेसबुक मित्राबरोबर पळाली…’ नवऱ्याची उच्च न्यायालयात धाव

राजकारणात कुणी कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो. पाहुणे घरी आले की, त्यांचे आपण स्वागत करतो. तसेच स्वागत आम्ही नवनीत राणा आणि रवी राणा यांचे केले आहे. मात्र, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे अभिजीत अडसूळ यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘चारशे पार’चा नारा देण्यात आला आहे. त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्रित काम करणार असल्याचे अभिजीत अडसूळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. महायुती मधील सर्व घटक पक्ष एकत्रित काम करतात. त्यामुळे आम्ही एकत्रित काम करणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्या भेटीनंतर सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp s navneet rana and ravi rana seek support from abhijeet adsul for lok sabha election visited adsul s home to convince mma 73 psg