“ड्रॉईंगरूम” मधून बसून बातम्या ऐकून आम्हालाही बेळगावचा लढा माहिती आहे, असे म्हणणे म्हणजे सीमावासीयांच्या लढ्याचा अपमान असल्याचा टोला भाजपचे प्रसाद लाड यांनी अप्रत्यक्षपणेपणे शिवसेनेचे (ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना हाणला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलताना लाड म्हणाले, म्हैसूर, कर्नाटक, बेळगाववरून सत्ताधाऱ्यांना “टार्गेट” करणे सोडा. या आरोपामुळे राज्याचा अपमान होत आहे.
देशाच्या विभाजनात तेव्हाच्या सरकारने माती खाल्ली. तीच माती आता आम्हाला चाखावी लागत आहे. सोलापूरच्या गावांचा निर्णय देखील २०१२ मध्येच झाला होता. काँग्रेसची भूमिका नेहमीच बोटचेपी राहिली आहे. आता ते आरोप-प्रत्यारोपावर आले आहेत. संवेदना मरेपर्यंत विषय चघळायचा, हेच आता ते करत आले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे खच्चीकरण विरोधक करत आहेत. केवळ टोमणे मारण्याचे काम करण्यापेक्षा मागील अडीच वर्षात हा प्रश्न का नाही सोडवला, असा प्रश्न लाड यांनी उपस्थित केला.