गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली असून यात भाजप व संघ परिवाराशी संबंधित व्यक्तींना संधी देण्यात आली आहे. यातील दोन सदस्य विद्यापीठ क्षेत्राबाहेरील असल्याने शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.
स्थापनेपासूनच विविध कारणांनी चर्चेत असलेल्या गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने यावेळी सर्वात आधी अधिसभा निवडणूक घेतली होती. मात्र, राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती रखडल्यामुळे तीन महिन्यांपासून अधिसभेची बैठक झालेली नव्हती. या नियुक्त्यामुळे अधिसभेचा मार्ग मोकळा झाला असून येत्या १७ जानेवारीला होणारी अधिसभेची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> चंद्रपूर : शेतात वीजप्रवाह सोडून चौघांनी चितळाची शिकार केली, पण…
राज्यपालांनी नामित केलेल्या सदस्यांमध्ये गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचीत पोरेड्डीवार, पीयूष मामीडवार, सतीश चीचघरे, स्वरूप तार्गे, शशीभूषण वैद्य, विजय बडकल, नितीन लाभसेटवार, सागर वजे, संजय रामगिरवार यांचा समावेश आहे. हे सर्व सदस्य विविध क्षेत्रातील असले तरी भाजप आणि संघ परिवाराशी संबंधित आहेत.
हेही वाचा >>> कारागृहातून बाहेर येताच गुंडाने केला खून, उपराजधानीत दर दुसऱ्या दिवशी हत्याकांड
एका सदस्याची नियुक्ती अद्यापही रखडलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित महिला सदस्याचे नाव अंतिम करण्यात आले होते. परंतु या महिलेवर एका प्रकरणात दाखल गुन्ह्यामुळे पोलीस पडताळणी न झाल्याने ही नियुक्ती खोळंबली. घोषित सदस्यांमध्ये दोघे वर्धा आणि नागपूरचे असून ते विद्यापीठ क्षेत्राच्या बाहेरचे असल्याने काही संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधिसभेवर कुणाची नियुक्ती करावी हा सर्वस्वी राज्यपालांचा निर्णय आहे. मात्र, चंद्रपूर आणि गडचिरोली वगळून विद्यापीठ क्षेत्राबाहेरच्या व्यक्तींची निवड करणे या क्षेत्रातील पात्र व्यक्तींवर अन्याय आहे, अशी टीका अधिसभा सदस्य अजय लोंढे यांनी केली आहे.