संजय राऊत
गोंदिया : राज्यसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली असताना गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्यावर आपली दावेदारी सांगण्यासाठी भाजप-सेना समोरासमोर उभे ठाकले आहेत.
हेही वाचा >>> आजच्या सभेत केवळ गाजरं उधळण्यापलीकडे काहीही होणार नाही – उद्धव ठाकरेंच्या सभेवरून भाजपाची टीका!
राज्यसभेतील शिवसेना उमेदवाराला समर्थन दिल्याबद्दल आमदार विनोद अग्रवाल यांचे जिल्हा शिवसेना प्रमुख पंकज यादव यांच्याद्वारे अभिनंदन करणारे फलक गोंदियातील मुख्य चौकात लावण्यात आले होते. मात्र यावर आक्षेप घेण्यात आल्याने ते रात्रीतून काढण्यात आले. अग्रवाल यांनी भाजपाचे बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आणि जिंकल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी आपले समर्थन भाजपला असल्याचे पत्र देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. पण नंतर राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली. अग्रवाल यांचे स्थानिक भाजपशी बिनसले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळिक वाढवली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर गोंदिया पंचायत समितीत अग्रवाल यांच्या चाबी संघटनेने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून सत्ता स्थापन केली.
हेही वाचा >>> विरोधकांचं जे तोंड आहे ते तोंड नसून गटार आहे – शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर
आता भाजपाशी नाराज असलेले विनोद अग्रवाल अत्यंत चुरशीच्या झालेल्या राज्यसभा निवडणुकीत कुणाच्या बाजूने मतदान करतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण अपक्ष असल्यामुळे त्यांना आपले मत प्रतोदला दाखवणे आवश्यक नाही. या संदर्भात आमदार विनोद अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर नंतर बोलू असे म्हणत वेळ मारून नेली.