नागपूर: ग्राम पंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हांवर लढवली जात नाही. त्यामुळे त्या निवडणुकांचा निकाल आपल्याच बाजूने लागण्याचा दावा करून छाती फुगवण्यापेक्षा हिंमत असेल तर पराभवाच्या भितीपोटी थांबवून ठेवण्यात आलेल्या महापालिका, नगरपरिषद निवडणुका तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुका घेऊन दाखवा असे आव्हान माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी भाजपला आज येथे दिले. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल लागताच मुंबई पासून तर गल्ली पर्यत भाजपाची नेते मंडळी जल्लोष साजरा करीत आहेत. राज्यात मोठा पक्ष म्हणून दावा करीत आहेत. परंतु कोणत्या ग्राम पंचायत मध्ये त्यांची सत्ता आली याची यादी मात्र देत नाही. काही प्रतिज्ञा पत्र दाखवून ते प्रसार माध्यमांनसमोर येतात आणि चुकीची आकडेवारी सांगण्यावर त्यांचा भर आहे. इकीच पोटतिडकी जर त्यांनी राज्यातील शेतकरी, बेरोजगारी, महागाई, आरक्षणाच्या प्रश्नावर दाखविली असती तर राज्यातील सर्व सामान्य जनतेला याचा फायदा झाला असता. परंतु याकडे लक्ष देण्यासाठी भाजपाच्या नेत्यांना का वेळ नाही? असा प्रश्न अनिल देशमुख यांनी उपस्थित केला.
हेही वाचा… एसटी कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आंदोलनाचे आवाहन? कामगार संघटनांमध्ये स्पर्धा
राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली नाही. केंद्र सरकारने शेतीमालाचा जी आधारभूत किंमत जाहीर केली, ती आधीच तुटपुंजी आहे. राज्यातील उद्योग बाहेर जात असून बेरोजगाराच्या हाताला काम नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची बिकट परिस्थीती आहे. यामुळे जनतेमध्ये भाजपाच्या विरुध्द मोठया प्रमाणात रोष आहे. यामुळे सत्ताधारी भाजपा राज्यातील महापालिका, नगरपरिषद घेत नाही. गिरीष बापट यांच्या निधनामुळे पुणे येथील व बाळू धानोकर यांच्या निधनामुळे चंद्रपूर येथील लोकसभेची जागा रिक्त आहे. इतर राज्यात रिक्त झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुका घेण्यात आला. परंतु पुणे व चंद्रपूर लोकसभा येथे पोटनिवडणूक सत्ताधारी भाजपा का घेतली नाही ? असा सवालही अनिल देशमुख यांनी उपस्थित केला.