नागपूर: वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेमध्ये (नीट) झालेल्या गैरप्रकाराची चर्चा देशभर आहे. नीट च्या निकालावरून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. अशातच सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी , अशी मागणी काँग्रेसने नुकतीच केली होती. त्यानंतर आता देशपातळीवर हा विषय चर्चेला आला आहे. यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारवर टीका केली आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा फकटा बसला असून त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याने लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरही अन्याय झाला असून सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. नीट परीक्षेतील घोटाळा पाहता या प्रकरणाची सर्वंकश चौकशी करावी तसेच निकालाचे फेरमुल्यांकन करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

हेही वाचा : अफ्रिकेतील ‘कॉम्रेड मॅरेथॉन’मध्ये बुलढाण्याचा डंका…. पाच जणांची बाजी…

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, एका परीक्षा केंद्रावरील ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे ७२० पैकी ७२० गुण मिळाले आहेत. नकारात्मक गुण प्रणाली असताना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले? नकारात्मक गुण प्रणालीमुळे एक उत्तर चुकले तर ५ गुण कमी होतात. पण काहींना ७१६, ७१८ गुण मिळाल्याचेही दिसत आहे, यामुळे हा प्रकार संशयास्पद वाटतो. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्वाची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून ही परीक्षा दिली त्यांच्यावर हा अन्याय आहे. या गैरकारभारात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने विद्यार्थ्यांचे आयुष्यही अंधकारमय करून टाकले आहे. घोटाळे, गैरकारभार, पेपरफुटी असे प्रकार सर्रास होत आहेत. काँग्रेस पक्षाने सत्तेत आलो तर पेपरफुटीवरोधात कठोर कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. भाजप सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये व असे गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असेही नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा : जलसंपदा विभागा निकाल जाहीर होताच उमेदवारांनी घेतला आक्षेप, आरक्षणसह या मुद्यांवर…

‘नीट’वर मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले होते ?

पेपरफुटी, गैरप्रकार आणि भ्रष्टाचार हे ‘नीट’सह अनेक परीक्षांचे अविभाज्य भाग झाले आहेत अशी टीका पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. त्यांनी एक्सवर लिहिले की, ‘आम्ही या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशीची मागणी करतो, जेणेकरून नीट आणि अन्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.’’ काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश, सरचिटणीस प्रियंका गांधी या नेत्यांसह पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’चे (एनएसयूआय) प्रमुख वरुण चौधरी यांनीही ‘नीट’मधील गैरप्रकारांविषयी चिंता व्यक्त केली.