भाजपने संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना लक्ष्य केले आणि आता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. यावरून भाजप राजकीय स्वार्थासाठी किती खालच्या स्तराला जाऊ शकते हे दिसते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी केली. भाजपने आता त्यांची माफी मागितली पाहिजे, असेही ते म्हणाले.
एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोप झाल्यानंतर राठोड यांना महाविकास आघाडी सरकारमधून राजीनामा द्यावा लागला होता. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले आहे. त्यावरून कुंटे पाटील यांनी टि्वट करत भाजपवर तोफ डागली आहे. भाजप महिला विरोधी पक्ष आहे. समाजात सुमारे ५० टक्के महिला आहे. पण, एकाही महिलेचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. अनेक वादग्रस्त आमदारांना मंत्रिमंडळात घेतले. एवढेच नव्हे तर ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच मंत्रिमंडळात घेतले आहे. यातून भाजप सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो, हे स्पष्ट होते.