नागपूर : गेल्या १७ मार्च रोजी नागपुरात गांधी गेट परिसरात दोन गटात दंगल झाली. या दंगलीस एक गट कसा कारणीभूत आहे, याबाबत वारंवार प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याला थेट सीरियातून धमकी देण्यात आली. जीवे मारण्याची धमकी येताच भाजप प्रवक्त्यांनी लगेच सीताबर्डी पोलीस स्टेशन गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कानावर हा प्रकार टाकला आणि लगेच तक्रार अर्ज दाखल केला. अजय पाठक असे तक्रारदार भाजपाच्या प्रवक्त्याचे नाव आहे. त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दिला असून जीवाला धोका असल्यामुळे सुरक्षा पुरविण्याची मागणी त्यांनी पोलिसांना केली आहे.

अजय पाठक हे महाराष्ट्र भाजपचे प्रवेक्त असून ते नागपुरात घडलेल्या दंगलीवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत. ही दंगल कशी घडली दंगलीस कोणते घटक कारणीभूत आहे? दंगल भडकवण्यास कुणी प्रोत्साहन दिले? दंगलीत एका गटाचे किती नुकसान झाले? तसेच दंगलीस कोण कारणीभूत आहेत? याबाबत ते विविध टीव्ही चॅनल ला प्रतिक्रिया देत होते. दंगलीसंदर्भात त्यांनी एका विशिष्ट गटावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या भ्रमणध्वनीवर ९७ या कोड क्रमांकावरुन एक फोन आला. ‘जो तूम कर रहे हो, वह ठिक नही हैं, इसलिये तुम्हारे साथ जो होगा वह ठिक नही होगा’ अशी धमकी देण्यात आली. या धमकीमुळे पाठक घाबरले. त्यांनी पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी मिळण्याबाबत तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी तक्रार अर्जाची नोंद घेतली आणि पुढील तपासासाठी तो अर्ज सायबर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आला.

भाजपचे प्रवक्ते अजय पाठक यांचा लेखी अर्ज पोलीस ठाण्यात प्राप्त झाला. त्यांनी सिरियातून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. त्यांचा अर्ज सायबर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आला आहे.- विठ्ठलसिंह राजपूत (ठाणेदार, सीताबर्डी पोलीस ठाणे)