नागपूर : ब्रिटिश भारत सोडून गेले आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटीश काळानंतर स्वातंत्र्याच्या पहिल्या २५ वर्षात काँग्रेसने देशावर राज्य केले. त्यावेळी कुणी विरोधी पक्ष नव्हता. दरम्यान, त्यानंतरच्या २५ वर्षात लोकांनी काँग्रेसच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१४ ला देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात आली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताचा खरा सुवर्णकाळ सुरू झाला. भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मोदी काळात मिळाले, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केले.

पद्मगंधा प्रतिष्ठानच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘राजयोगी’ या लेखिका शुभांगी भडभडे लिखित कादंबरीचा प्रकाशन सोहोळा रामनगर येथील श्रीशक्तीपीठ येथील लक्ष्मी सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित तर अध्यक्षस्थानी लेखक डॉ. कुमार शास्त्री आणि प्रमुख अतिथी म्हणून भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, वक्ते आशुतोष अडोणी व्यासपिठावर होते. मोदींवर इतकी चांगली कादंबरी लिहीली जाऊ शकते, हे आश्चर्य आहे. भारत त्यांच्या नेतृत्त्वात प्रगती करत आहे, असे माजी राज्यपाल पुरोहित म्हणाले.

भारताला स्वातंत्र्य मिळून आता ७८ वर्षे पूर्ण होतील आणि भारतीय स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेत, असे प्रतिपादन शिवराय कुळकर्णी यांनी केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली २५ वर्षे एकाच कुटूंबाने कारभार चालवला. तेव्हा विरोधक नव्हते. नंतरच्या २५ वर्षात विरोधक तार झाले आणि भारताला खऱ्या अर्थाने सर्वांगाने स्वातंत्र्य मोदी पंतप्रधान झाल्यानंतर म्हणजेच २०१४ नंतर मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणे हा अतिशय आनंददायी क्षण होता आणि त्यांच्यावर लिहिलेली कादंबरी प्रकाशनापूर्वी त्यांच्या हातात सोपवणे हा सौभाग्याचा क्षण होता, असे प्रतिपादन शुभांगी भडभडे यांनी केले. आता कादंबरी कशी झाली ते वाचकच ठरवणार, असेही त्या म्हणाल्या. या कादंबरीचा इंग्रजी व हिंदी अनुवाद लवकरच करण्यात येईल. तसेच या पुस्तकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रस्तावना असल्याचेही त्यांनी सांगितले.