लोकसत्ता टीम
नागपूर : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा चुकीचा अर्थ काढून भारतीय जनता पक्ष त्यांच्या अंगभूत सवयीप्रमाणे खोटा प्रचार करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाला भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानत नाही. आरक्षणाला संघाचा  विरोध आहे, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आरक्षण संपुष्टात आणले पाहिजे, अशी जाहीर वक्तव्ये केलेली आहे. त्यामुळे भाजपाने कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांचा आरक्षणविरोधी चेहरा लपवू शकत नाहीत, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या एका विधानाची मोडतोड करुन भाजप आपली राजकीय पोळी भाजत आहे. वास्तविक पाहता आरक्षणाला विरोध हा भारतीय जनता पक्षच करत आलेला आहे. “माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला आहे, मी आरक्षण विरोधी नाही, आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त मिळावे”, ही भूमिका असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. देशातील सर्व समाज घटकांना न्याय मिळावा यासाठी जातनिहाय जनगणना करावी व ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवावी हीच काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांची भूमिका आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे, त्यामुळे आरक्षणविरोधी कोण आहे, हे सांगण्यासाठी ज्योतिष्याची गरज नाही.

हेही वाचा >>>नागपूर हिट अँन्ड रन: कॉंग्रेस आमदार विकास ठाकरे – सुषमा अंधारे यांच्यात जुंपली

राजकीय आरक्षण घालवणारे खलनायक

राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवणारे खलनायक देवेंद्र फडणवीसच आहेत. मराठा, धनगर, आदिवासी समाजासह इतर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन फडणवीस यांनी या समाजाची फसवणूक केलेली आहे. केंद्रातील भाजपा सरकारने सचिव पदावर थेट भरती करुन एकाच विशिष्ट जातीतील समाजाच्या तरुण तरुणींची थेट सचिव पदावर भरती केली होती, हा सुद्धा आरक्षण संपवण्याचाच एक प्रकार आहे. त्यामुळे आरक्षण, संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलण्याचा भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना काहीही अधिकारी नाही, असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा >>>नागपूर : पोलीस अवैध धंदेवाल्यांच्या संपर्कात! पोलीस कर्मचारीच निघाला….

शिंदे हे मोदी-शहाचे हस्तक 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करत बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष व चिन्हही चोरले, मोदी-शाह यांचे ते हस्तक आहेत. भाजपा जे सांगेल तेवढेच ते बोलू शकतात, त्यांनी आरक्षण व राहुल गांधी यांच्यावर बोलू नये. शिंदे यांनी आधी आरक्षणाचा अभ्यास करावा, संघ, मोहन भागवत व भाजपची आरक्षणाबद्दलच्या भूमिकेचा अभ्यास करावा व बोलावे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पदेशात भारताबद्दल काय काय बोलले त्याचे व्हिडीओ यु ट्यूब व सोशल मीडियावर उपलब्ध आहेत, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा नीट अभ्यास करावा मग बोलावे, असा सल्लाही नाना पटोले यांनी दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp spreading false propaganda against rahul gandhi regarding reservation says nana patole rbt 74 amy