कोराडीतील काही तरुणांनी हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावलेल्या शुभेच्छा फलकावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे छायाचित्र असल्याने वाद निर्माण झाला होता. आक्षेपानंतर अखेर हा फलक काढण्यात आला असून लावणाऱ्यांना तेथे माफीनाम्याचा फलक लावावा लागला आहे. यामुळे बावनकुळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोराडीत काही दिवसांपूर्वी तेथील काही तरुणांनी बाजार चौकात हनुमान जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारा फलक लावला होता. त्यावर एका बाजूला हनुमानजींचे तर दुसऱ्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायात्रित्र आहे व त्यावर बावनकुळे यांचे मोठे छायाचित्र असून त्याच्या बाजूलाच बावनकुळे यांच्या पत्नी व मुलाचेही छायाचित्र आहे.बाबासाहेबांच्या छायाचित्रावर बावनकुळेंचे छायाचित्र असल्याने अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला. समाजमाध्यमावर हा फलक प्रसारित झाला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत ‘हा काय घाणेरडा प्रकार आहे‘, या शब्दात संताप व्यक्त केला. यानंतर फलक हटवण्यात आला.
हेही वाचा >>>“लढा गड्यांनो लढा, कुठूनही लढा,”; कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीबाबत भाजपाचा पवित्रा
दरम्यान, संतप्त नागरिकांनी ज्या ठिकाणी शुभेच्छा फलक लावला होता त्याच ठिकाणी माफीनाम्याचा फलक लावण्यास सांगितले. त्यानुसार माफीनाम्याचा फलक कोराडीत लावण्यात आला असून तो सुद्धा समाजमाध्यमावर प्रसारित झाला आहे. माफीनाम्यावर नरेश जामदार, मनज सावजी, मेघराज बेलेकर, लक्ष्मण बेलेकर आणि शाहू जामदार यांची नावे आहेत.व्हायरल होत असलेल्या बॅनरचा दुरान्वयेही संबंध भाजपा व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी नाही. हा प्रकार लक्षात येताच कार्यकर्त्यांनी लेखी माफी मागितली व तसे माफीचे बोर्डही लावले. भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांसाठी वंदनीय आहेत. आपण विकासाचे काम करूया, असे बावनकुळे यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट आले आहे.