गोंदिया : महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी असो वा एम.आय.एम., यासारखे कितीही पक्ष सहभागी झाले तरी काहीही फरक पडणार नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने महाराष्ट्रात ५१ टक्के मते प्राप्त करण्यासाठी आमची लढाई सुरू आहे. एकटे प्रकाश आंबेडकर म्हणजे भीमशक्ती नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शिक्षक मतदारसंघातील उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचाराकरिता गोंदियात आले असता बावनकुळे बोलत होते. भीमशक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर काम करणाऱ्या अनेक संघटना आणि कार्यकर्ते आहेत. त्यातील बरेचजण आमच्यासोबतही आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासारखे मोठे नेते आमच्यासोबत आहेत. त्यामुळे अशा ‘बेमेल आघाडी’मुळे काहीही फरक पडत नाही, असे बावनकुळे म्हणाले.
भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्याकरिता कितीही शक्ती एकत्र आल्या तरी शेवटी आमचीच शक्ती प्रचंड मोठी आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासरखे आमचे महाराष्ट्रातील नेतृत्व ‘संताजी-धनाजी’सारखे १८-१८ तास काम करणारे आहेत. ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतात, त्यांचे प्रश्न सोडवतात, प्रवास करतात. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात राज्यात मोठमोठी विकासाची कामे होत आहेत. महाविकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ओवेसींसोबत मांडीला मांडी लावून बसले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, असेही बावनकुळेंनी ठासून सांगितले. यावेळी आ. परिणय फुके, माजी आमदार गोपालदास अग्रवाल उपस्थित होते.