अकोला : जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचे एकत्रिकरण करून जनसंवादातून आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्याच्या सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना जनसंवादाचा मंत्र देण्यात आला आहे.
पश्चिम विदर्भातील नऊ विभागाची संघटनात्मक आढावा बैठक भाजपच्यावतीने अकोल्यात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे, प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोटेकर आदी उपस्थित होते. यावेळी खासदार अनुप धोत्रे, खासदार अनिल बोंडे, आमदार वसंत खंडेलवाल, माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा : चंद्रपूर : जिल्हाधिकारी, सीईओंची भरपावसात धानशेतात रोवणी, पदाचा अभिनिवेश न बाळगता थेट चिखलात…
एक ऑगस्ट ते निवडणूक संपेपर्यंत कार्यकर्त्यांनी १४ कोटी जनतेचा विकास करण्याच्या दृष्टीने सरकारने जाहीर केलेल्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा. जुने व नवीन कार्यकर्त्यांचा संगम एकत्रिकरणात करावा. धार्मिक, सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्राच्या नागरिकांशी संवाद साधा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी पक्षाचे विविध कार्यक्रम, मंडळनिहाय बैठका व मतदार नोंदणी सर्व बाबींचा आढावा घेतला. पदाधिकाऱ्यांनी जिल्हानिहाय सरकारच्या योजना पोहोचवण्याच्या दृष्टीने उपाययोजना व त्याचे महत्त्व यावर डॉ. संजय कुटे यांनी माहिती दिली. बैठकीला दोन खासदार, १६ आमदार, आठ माजी आमदार तसेच जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष यांच्यासह नऊ विभागातील ४४२ पदाधिकारी उपस्थित होते.
तीन टक्के मतांमुळे १७ जागा गमावल्या – आमदार सावरकर
कार्यकर्त्यांमध्ये एखाद्या विषयावर मतभेद असणे वेगळे असू शकते. मात्र, मनभेद करणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे. केवळ तीन टक्के मतांमुळे महाराष्ट्रात १७ लोकसभा मतदारसंघात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मतदान नोंदणी व जनतेशी संवाद साधावा, असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
हेही वाचा : वर्धा : तिहेरी प्रेम प्रकरणातील तरुणीचाही अखेर मृत्यू, प्रेयसीच्या खोलीवर तरुणाला बघताच राग अनावर झाला आणि…
निवडणुकीच्या तयारीवर जोर
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारीवर दिला आहे. आढावा बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक, संघटनात्मक स्थिती, विधानसभानिहाय चित्र, नकारात्मक आणि सकारात्मक मुद्दे, चेतना जागृती आदींची माहिती घेण्यात आली. अकोला शहर, अकोला ग्रामीण, अमरावती शहर व ग्रामीण, यवतमाळ शहर व पुसद विभाग, तसेच वाशीम जिल्हा, बुलढाणा व खामगाव अशा नऊ विभागाचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध क्षेत्रातील मतदारांशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली. या माध्यमातून निवडणुकीची तळागाळातून मोर्चेबांधणी करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.