नागपूर : विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच कोण कोठून लढणार याचे आराखडे बांधणे सुरू केले आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते त्यांच्या कामठी ( जि.- नागपूर) मतदारसंघांतून लढणार नाही, पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणणार,असे जाहीर केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
कोणाचा त्याग किती मोठा आणि महत्त्वाचा आहे, हे मोजण्याची आज गरज नाही. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेकडे आहे तर जास्तीत जास्त आमदार आमच्याकडे आहे. त्यामुळे महायुतीचे नुकसान होऊ नये याची काळजी घेत सत्तेतील काही महामंडळ हे भाजपकडे असावेत असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा…धक्कादायक… विविध आजारांच्या लक्षणांमध्ये बदल; बालरोगतज्ज्ञ म्हणतात, “करोनापश्चात…”
बावनकुळे विधान परिषदेचे सदस्य आहेत. कामठीत भाजपचे टेकचंद सावरकर विद्यमान आमदार आहेत २०१९ मध्ये बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी दिली नव्हती, त्यामुळे यावेळी बावनकुळे कामठीतून लढणार का? याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र बावनकुळे यांनी स्वतः याबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले कामठी विधानसभा मतदार संघात उमेदवारी मागितली नाही आणि मागणार नाही. जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणणार. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी सांभाळत राज्यात महायुतीची सत्ता आणणण्यासाठी प्रयत्न केले जाईल.
हे ही वाचा…‘धूम स्टाईल’ वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढली
भाजपचाही त्याग
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय चर्चा झाली त्याबद्दल मला माहिती नाही. मात्र एकनाथ शिंदे असो की अजित पवार यांनी जर त्याग केले असेल तर आमच्या पक्षाने त्याग केला आहे. सर्वाधीक आमदार आमच्याकडे आहे. त्यामुळे कोणी किती मोठा त्याग केला हे महत्त्वाचे नाही तर महायुतीचे नुकसान होऊ नये यासाठी तीनही नेत्यांनी समन्वय ठेवत आणि मोठे मन करत आमच्या पाठिशी त्यांनी उभे राहिले पाहिजे असेही बावनकुळे म्हणाले. कोणाचा त्याग किती मोठा आहे हे मोजता नाही हे खरे आहे. मात्र राज्याला आज महायुतीची गरज आहे, त्यामुळे काही बाबतीत त्यांनी मोठे मन करुन भाजपला पाठिंबा द्यावा. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून त्यांनी जास्त जागा लढल्या पाहिजे असे नाही मात्र ज्या ज्या मतदार संघात तिघांपैकी ज्यांचे प्राबल्य आहे आणि उमेदवार सक्षम आहे त्या ठिकाणी त्यांचा विचार झाला पाहिजे. महायुतीमधील ताणतणाव निवडणुकीच्या काळात परवडणारे नाही. महायुती एकत्रित राहणार असून ती जिंकण्यासाठी लढणार आहे असेही बावनकुळे म्हणाले. केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत असताना गेल्यावेळेस आम्ही ज्या मतदार संघात चांगल्या पद्धतीने लढलो त्यावर चर्चा करणार आहे. ज्या जागेवर भाजपचे उमेदवार निवडून येऊ शकतात अशा जागेवर चर्चा केली जाणार आहे. भाजपचे जे आमदार थोड्या मताने पराभत झाले अशा विद्यमान आमदारांच्या नावाचा विचार केला जाणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.