नागपूर : कार्यकाळ संपताच मागील आठ महिन्यात भाजपच्या ७० टक्के माजी नगरसेवकांचा त्यांच्या प्रभागातील जनतेशी संवाद संपल्याची बाब पक्षाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. या अहवालाची गंभीर दखल घेत याबाबत पक्षातील वरिष्ठ नेते बैठक घेणार असल्याची माहिती आहे.
नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने पाच मार्चपासून महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आठ महिन्यापासून प्रशासकांकडेच महापालिकेची सुत्रे आहेत. दुसरीकडे पद गेल्यानंतर माजी नगरसेवकांचा लोकांशी संपर्कच कमी झाला आहे.निवडणुकाही लांबणीवर पडत असल्याने सुरूवातीला त्यांच्यात असलेला उत्साह कमी झाला आहे. पक्षाच्या नेत्यांकडे याबाबत तक्रारी आल्यावर आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एका खासगी संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण केले. त्यात पक्षाच्या ७० टक्के माजी नगरसेवकांचा त्यांच्या प्रभागातील जनतेशी संपर्क तुटल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा >>> नागपूर : ज्युनियर मिस इंडिया स्पर्धेविरोधात महिला संघटनांची निदर्शने
लोकांनी आणलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे, नगरसेवक नाही असे सांगून प्रशासकाकडे बोट दाखवणे, फक्त समाज माध्यमावर सक्रिय असणे, नवरात्रोत्सव, दिवाळी मिलन याच कार्यक्रमातच दिसणे यासह अनेक बाबी या सर्वेक्षणातून पुढे आल्या असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. भाजपच्या कोअर समितीची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. त्यात सर्वेक्षणातील निष्कर्षावर चर्चा झाल्याची माहिती आहे. १५ नोव्हेंबरला सर्व माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक घेण्यात येणार असून त्यात पक्षातील वरिष्ठ नेते मागदर्शन करणार आहे. महापालिकेत भाजपचे १०८ नगरसेवक होते. त्यातील ७० टक्के पुन्हा लढण्यास इच्छुक आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात बहुतांश नागरिकांनी शहरातील विविध भागातील समस्यांबाबत निवेदन देताना त्यांच्या भागातील माजी नगरसेवकांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे.
माजी नगरसेवकांची बैठक घेणार
माजी नगरसेवकांविरोधात नाराजी नाही. पण त्यांना सोबत घेऊन जनतेची कामे कशी करता येईल यासाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. यासंदर्भात लवकरच माजी नगरसेवकांची बैठक घेणार आहे.