-राम भाकरे
महापालिकेत बाक खरेदी घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच आता बाकावरील नाव पुसल्याच्या कारणावरून नागपुरात भाजपचे आमदार कृष्णा खोपडे व काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप युध्द सुरु झाले आहे.
खोपडे यांनी वंजारी यांच्या सुचनेनुसार बालकांवरील नाव पुसण्यात आले,असा आरोप आ. खोपडे यांनी केला असून यांबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. दुसरीकडे आ.अभिजित वंजारी यांनी खोपडेंचे आरोप फेटाळून लावले. असले प्रकार आपण कधीही करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण
भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आमदार निधीतून शांतीनगर, प्रेमनगर भागात नागरिकांना बसण्यासाठी लोखंडी बाक लावले होते. त्यावर खोपडे यांचे नाव होते. मात्र यापैकी काही बाकांवर रंग लावून खोपडे यांचे नाव पुण्यात आले व त्यावर अभिजित वंजारी यांचे नाव लिहिण्यात आले. त्यामुळे खोपडे संतप्त झाले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व नागपूरमध्ये उद्भवलेला वाद कोणत्या वळणावर जातो हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे.
खोपडे यांचे आरोप
कंत्राटदाराच्या माध्यमातून कांग्रेस आमदार अभिजित वंजारी यांचे नाव लिहिण्यात आले. त्यामुळे कंत्राटदाराविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खोपडे यांनी केली. या प्रकरणात कंत्राटदारांकडून बोगस देयक काढण्याचा प्रयत्न केला गेला,अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
काय आहे राजकारण
अभिजित वंजारी कांग्रेसचे विधानपरिषद सदस्य आहेत. पक्षाने त्यांच्याकडे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली. खोपडे हे या मतदार संघाचे भाजपचे आमदार आहेत. कांग्रेसने हा मतदारसंघ पुन्हा आपल्या घ्यायचा आहे. त्यामुळे कांग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय स्पर्धेची किनार या बाक प्रकरणाला आहे