नागपूर : संभाजी भिडे ज्या पद्धतीने कधी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर तर कधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करतात आणि आता अमरावतीत महात्मा गांधीं बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. अश्याप्रकारे वक्तव्य करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपला भिडेंच्या माध्यमातून मणिपूर प्रमाणे महाराष्ट्र पेटवायचा आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो.
विधानसभेत काँग्रेसच्या वतीने संभाजी भिडेला अटक करा अशी मागणी केल्याचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. ते नागपुरात शनिवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य कुठल्यातरी संघटनेने केले होते. त्यामध्ये फडणवीस यांनी सांगितले की अशा लोकांचे फक्त मुस्के बांधायचे नाही तर त्यांना फाशी लावायची, असे त्यांच्या डोक्यात आहे. आता आमचा सवाल आहे की राज्याचे गृहमंत्री संभाजी भिडे यांना फाशी लावणार काय?
अमरावतीला आमच्या लोकांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तणाव निर्माण करण्याच्या प्रकरणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकार त्यांना सातत्याने पाठीशी घालत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडे होते पण निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल झाले. ज्यावेळी भीमा कोरेगावची घटना झाली त्यावेळी राज्यात भाजप सरकार होते. या दोन-तीन दिवसात संभाजी भिडे यांना अटक केली नाही तर विधानसभेचा मुद्दा उपस्थित करू, असेही पटोले म्हणाले.