चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी अब की बार ४०० पारचा नारा देत असले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा व मोदी यांना २०० पेक्षा अधिक जागा जिंकता येणार नाही. त्यामुळे मोदी यांना पंतप्रधान देखील होता येणार नाही, असे मत काँग्रेसचे राज्यसभेचे माजी खासदार तथा ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी व्यक्त केले. इलेक्टोरल बाँड हा जगातील सर्वांत मोठा घोटाळा असून उघड उघड दादागिरीने खंडणी गोळा करण्याचा कायदेशीर मार्ग असल्याची टीकाही केली.
मुक्तसंवादच्या वतीने हॉटेल एनडी येथे आयोजित हुकुमशाही विरुद्ध लोकशाही या कार्यक्रमासाठी केतकर येथे आले होते. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना कुमार केतकर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. लोकशाही पद्धतीने निवडून येवून हुकूमशाही लादण्याची नवीन पद्ध जगात सुरू झालेली आहे. ही केवळ भारतात सुरू झालेली आहे असे नाही तर हंगेरी, टर्की येथे हा प्रकार आहे. भारतात त्याचा आविष्कार सर्वात प्रगत व उग्र आहे. भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. भारताची १४० कोटी लोकसंख्या आहे व ९७ कोटी मतदार आहे. या मतदारांना विशिष्ट प्रकारे जुंपायचे आणि त्यांच्यावर आपली मते, भूमिका आपली धोरणे लादायची असा हा प्रकार आहे. याचेच नाव हुकूमशाही आहे. नरेंद्र मोदी यांचा स्वपक्षीय खासदारांसोबत संवाद नाही. कॅबिनेटसोबत देखील चर्चा करित नाहीत. पीएमओच्या माध्यमातून आणि थोडाफार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या माध्यमातून त्यांचा कारभार सुरू आहे. यालाच हुकूमशाही असे म्हणतात. अलिकडच्या काळात याला निवडणुकीतून आलेली हुकूमशाही असे म्हणतात. मोदी यांचा प्रयत्न लोकशाही पद्धतीने निवडून येवून हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मोदी कोणत्याही प्रकारच्या मर्यादा न पाळता भ्रष्टाचाराचे सर्वांधिक आरोप असलेल्या अजित पवार, एकनाथ शिंदे, नारायण राणे यांना शुद्ध करून घेत भाजपात प्रवेश दिला. सत्ता सोडायची नसल्यामुळेच ही अशा पद्धतीने माणसे गोळा करित आहेत, असेही केतकर म्हणाले.
इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून ४७ हजार कोटी रुपये जमा केले. भाजप हा जगातील आर्थिकदृष्ट्या सर्वात समृद्ध पक्ष आहे. स्मगलर, ब्लॅक मार्केटींग करणाऱ्यांनीही इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून पैसा दिलेला आहे असाही आरोप केतकर यांनी केला.
हेही वाचा – अशोक चव्हाण म्हणतात, “काँग्रेसमधून मी बाहेर पडल्याने फरक…”
नोटबंदी हा देखील काळा पैसा पांढरा करण्याचाच एक प्रकार होता असेही ते म्हणाले. वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न केला गेला. मात्र त्यांना आघाडीसोबत यायचेच नव्हते. त्यामुळेच त्यांनी सुरुवातीला राज्यात ४८ जागा लढविणार, त्यानंतर २७ जागा लढविणार असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात त्यांनी काहीच ठिकाणी जागा लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आंबेडकर यांनी उमेदवार उभे केले असले तरी वंचितचा परिणाम होणार नाही असेही केतकर म्हणाले. या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा स्तर अतिशय खालच्या पातळीवर गेल्याबद्दल एक पत्रकार म्हणून चिंता व्यक्त केली.