चंद्रपूर : जिल्ह्यात काँग्रेसचा सुपळा साफ झाला असून सहा पैकी पाच जागांवर कमळ फुलले आहे तर एका जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे. ब्रम्हपुरी मतदार संघात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार वगळता बल्लारपुर मतदार संघात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपुरात किशोर जोरगेवार, वरोरा येथे करण देवतळे यांची आघाडी कायम आहे, तर चिमूर येथे किर्तीकुमार भांगडीया दहा हजारांपेक्षा अधिक मतांनी व राजुरा येथे देवराव भोंगळे यांनी अनपेक्षित २२०० मतांनी विजय मिळविला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या जिल्ह्यात विधानसभेचे एकूण सहा मतदार संघ आहेत. यापैकी सर्वात धक्कादायक व अनपेक्षित निकाल हा राजुरा या कुणबी बहुल मतदार संघातील आहे. येथे भाजपाचे देवराव भोंगळे पहिल्या फेरीपासून मागे होते. मात्र बाराव्या फेरीनंतर अनपेक्षितपणे मतांची आघाडी घेत समोर गेले व तेवीसाव्या फेरीत २२०० मतांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांचा पराभव केला. चिमूर क्रांतीभूमित किर्तीकुमार भांगडीया यांनी १० हजारांपेक्षा अधिक मतांनी काँग्रेसचे सतिश वारजूरकर यांचा पराभव केला. विशेष म्हणजे या मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस खासदार राहुल गांधी या दोघांच्याही सभा झाल्या होत्या. येथे मोदी जिंकले तर गांधी हरले अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Wardha Assembly Election Results 2024 : वर्धा जिल्ह्यातून काँग्रेसची घराणेशाही हद्दपार

बल्लारपुर मतदार संघात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार १५ हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहे. तर चंद्रपुरात भाजपाचे किशोर जोरगेवार वीस हजारांपेक्षा अधिक मते घेवून विजयाच्या दिशेने निघाले आहेत. वरोरा येथे भाजपाचे करण देवतळे दहा हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत. तर ब्रम्हपुरीत काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आठ हजार मतांनी आघाडीवर आहे. विशेष म्हणजे मतांची आघाडी घेतांना वडेट्टीवार यांची चांगलीच दमछाक होत आहे. पहिल्या काही फेरीत वडेट्टीवार माघारले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp wins in five constituencies in chandrapur congress leads in brahmapuri rsj 74 mrj