मतदारसंघभंडारा/गोंदिया

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फुके यांना १५३, राष्ट्रवादीचे रमेश जैन यांना १२१ तर काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल यांना ११२ मते मिळाली. काँग्रेसची दुसऱ्या पसंतीची ६७ मते भाजपच्या फुके यांना मिळाली.

प्रफुल्ल पटेल आणि गोपाळ अग्रवाल या दोन पारंपरिक प्रतिस्पध्र्याना आपापसात लढवित ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली स्मार्ट खेळी भाजपला फायदेशीर ठरली. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा झाला आणि भाजपचे परिणय फुके विजयी झाले. जिल्ह्य़ावर एकछत्री अंमल राखणाऱ्या प्रफुल्ल पटेलांना या निकालाने जोरदार धक्का बसला आहे.

फुके यांना १५३, राष्ट्रवादीचे रमेश जैन यांना १२१ तर काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल यांना ११२ मते मिळाली. काँग्रेसची दुसऱ्या पसंतीची ६७ मते भाजपच्या फुके यांना मिळाली. भाजपने मात्र दुसऱ्या पसंतीची मते कोणालाच दिली नाहीत. या मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांत राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन विजयी झाले होते. भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्य़ांत सर्वच पक्षांत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचे पाठीराखे आहेत. त्यामुळे जैन यांना कुणी हरवूच शकत नाही, असा समज सर्वानी करून घेतलेला. केवळ काँग्रेसचे गोपाल अग्रवाल या दोघांविरुद्ध  आजवर लढा देत आले. मात्र, निवडणुकीत आघाडी होत असल्याने त्यांचाही नाइलाज व्हायचा. या वेळी काँग्रेस व राष्ट्रवादीत आघाडी झाली नाही तरीही जैन बाजी मारतील, हा समज भाजपने आखलेल्या रणनीतीने खोटा ठरवला. प्रत्येक निवडणुकीत जैन मतदारांना जवळ करण्यासाठी शिक्षणसंस्था, तसेच जिल्हा बँकेत नोकरी देतो, अशी आश्वासने द्यायचे. हे लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी एक महिन्यापूर्वी जिल्हा बँकेचे संचालक मंडळच बरखास्त करून टाकले, त्यामुळे जैन यांचे अध्यक्षपद गेले. त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला यावेळी बसला.

पहिल्या पसंतीच्या बळावर निवडून येणे शक्यच नाही, हे लक्षात आल्यावर भाजपने काँग्रेसला जवळ केले. मतदानाच्या एक दिवस आधी या दोन्ही पक्षनेत्यांमध्ये नागपुरात बैठक झाली. पक्षाचा उमेदवार पडला तरी चालेल, पण जैन नको, या मुद्दय़ावर अग्रवाल यांनी दुसऱ्या पसंतीची मते फुकेंना देण्याचे मान्य केले. याचा फायदा भाजपला झाला व याच मतांच्या बळावर ते निवडून आले. गेल्या दोन वर्षांपासून राज्यशकट हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आजवर त्यांचा समर्थक आमदार निवडून आणता आला नव्हता. त्यामुळे संधी मिळताच त्यांनी त्यांचे खंदे समर्थक फुकेंना भंडाऱ्यात पाठवले. नागपूरचे नगरसेवक असलेल्या फुकेंना येथून रिंगणात उतरवण्याची कल्पना फडणवीस व खासदार नाना पटोलेंची. पटोलेंचे या जिल्ह्य़ातील एकाही भाजप आमदाराशी पटत नाही. त्यांना शह देण्यासाठी व मित्र असलेल्या मुख्यमंत्र्यांचे राजकीय वजन वाढवण्यासाठी खेळण्यात आलेली ही खेळी यशस्वी ठरली. प्रारंभी येथील शिवसेनेचे मतदार राष्ट्रवादीने गळाला लावले होते, पण येथे गडबड केली तर यवतमाळात पडसाद उमटतील, असा दम भाजप नेत्यांनी देताच फुकेंना सेनेची पूर्ण साथ मिळाली. राष्ट्रीय राजकारण स्वबळावर, तर जिल्ह्य़ाचे राजकारण जैन यांच्या बळावर, हे प्रफुल्ल पटेलांनी आजवर राबवलेले समीकरण या पराभवामुळे पार कोलमडून पडले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp won in bhandara gondia election