नागपूर : भाजप गटनेते पदाची घोषणा होताच देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घरासमोर भाजप कार्यकर्त्यांकडून मोठा उत्सव साजरा केला. . देवाभाऊ आगेबढो च्या घोषणा देण्यात आल्या देवेंद्र फडणवीस यांचा नाव भाजपचे कोर कमिटीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी निश्चित होताच नागपुरात त्यांच्या घरासमोर भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलाय. ढोल ताशाच्या निनादात कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच येतील असा आम्हाला विश्वास होता आणि आता हळूहळू एक एक टप्पा पार करून ती प्रक्रिया पार पडत असल्याचा आनंद असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री असे सर्व महत्वाचे पद भूषवलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. नागपूर महापालिकेतील नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री अशी त्यांची जाज्वल राजकीय कारकीर्द आहे. फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या दरम्यान पूर्ण पाच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर २०१९मध्ये औटघटकेचे मुख्यमंत्रीपद वगळता ते पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. नगरसेवक, महापौर, विरोधीपक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात त्यांनी मुख्यमंत्री, विरोधीपनेते, उपमुख्यमंत्री अशी तिन्ही महत्वाची पदे भूषविली होती.

हेही वाचा…जेष्ठांनी जीवाला जपायचे की हेल्मेटला? सक्तीमुळे पेच

फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात भाजपशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली. ते या संघटनेचे सक्रिय सदस्य होते. त्यांनी पहिल्यांदा नागपूर महापालिका निवडणूक राम नगर प्रभागातून जिंकली. १९९७ मध्ये फडणवीस नागपूर महापालिकेचे सर्वात तरुण महापौर बनले आणि ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तरुण महापौर होते. त्यानंतर पहिल्यांदा १९९९ मध्ये ते पश्चिम नागपूर विधानसभेमधून निवडून आले. या मतदारसंघातून सलग दोनदा आमदार झाले. त्यानंतर ते दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चारदा विजयी झाले. १९९९ पासून ते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत नागपूरचे प्रतिनिधित्व करत आहेत.

२०१४ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यानंतर ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ते ठरले. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले. पण काहीच दिवस टिकले.

हेही वाचा…Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस विदर्भातील पाचवे, नागपुरातील दुसरे मुख्यमंत्री

उच्चविद्याविभूषित

देवेंद्र फडणवीस यांचे शालेय शिक्षण भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या नागपुरातील इंदिरा कॉन्व्हेंटमधून झाले. त्यानंतर त्यांनी शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयात आणि धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून १९९२ मध्ये पदवी प्राप्त केली. त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि डीसीई, बर्लिनमधून प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती आणि तंत्रात पदविका प्राप्त केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp workers celebrated in front of devendra fadnavis nagpur house after group leader post announcement rbt 74 sud 02