अमरावती : अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते हे पराभव पचवू शकलेले नाहीत. ते गावागावांमध्ये मतदारांना धमक्या देत असून प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांच्यावर हल्ला होण्याची भीती असल्याने त्यांना पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणी अचलपूर येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली.
नेमका वाद काय?
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांमधील संघर्ष वाढला आहे. आमदार प्रवीण तायडे यांनी काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांच्यावर टीका करताना शिवीगाळ केल्याने प्रहारचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. प्रवीण तायडे यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली होती.
हेही वाचा >>> धावत्या दक्षिण एक्स्प्रेसमधील थरार , प्रवाशाचा खून
बहिरम येथे आमदार प्रवीण तायडे यांचे फलक काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी फाडून टाकले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना प्रवीण तायडे यांची जीभ घसरली होती. त्यांनी बच्चू कडू यांचा एकेरी भाषेत उल्लेख करीत त्यांना शिवीगाळ केली आणि माझ्या वाटेला जाऊ नका, तुमचे किती कार्यकर्ते आहेत, ते घेऊन या, जागा आणि वेळ ठरवा, मी कुठेही येण्यास तयार आहे, अशा शब्दात आव्हानही दिले होती. त्यांच्या या भाषणाची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्यानंतर प्रहारचे कार्यकर्ते संतप्त झाले होते.
हेही वाचा >>> वादात सापडलेल्या एमपीएससीच्या या परीक्षेची उत्तरतालिक जाहीर, हरकतीसाठी मुदत…
हल्ला किंवा अपघात घडवून आणण्याची भीती व्यक्त
त्यानंतर गुरुवारी अचलपूर येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीत पोहचून ग्रामीण पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. बहिरम येथे दर्शनी भागात लागलेल्या फलकावर थुंकून फलक फाडण्याचा प्रकार प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. प्रहारच्या कार्यकर्त्यांचा गुंड प्रवृत्तीचा इतिहास पाहता, बच्चू कडू यांच्या आदेशावरून त्यांचे कायर्कर्ते आमदार प्रवीण तायडे यांच्यावर हल्ला किंवा अपघात घडवून आणू शकतात, त्यामुळे प्रवीण तायडे यांना पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
बच्चू कडू यांचे कार्यकर्ते हे समाज माध्यमांद्वारे प्रवीण तायडे यांच्या विरोधात शिवीगाळ आणि त्यांची मानहानी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकाराला आळा घालण्याची मागणी भाजपने केली आहे. या प्रकरणातून भाजप आणि प्रहारचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. बहिरम येथील फलक फाडण्याच्या प्रकरणात प्रहारच्या कार्यकर्त्यांचा संबंध नसल्याचे प्रहार पक्षातर्फे सांगण्यात आले आहेत. पण दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.