नागपूर : लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली असली तरी विदर्भासह देशभरात भाजपच्या जागा कमी होत असल्याचे दिसत असताना भाजपच्या गोटात आणि पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये अस्वस्था होती. एरवी भाजपला यश मिळत असताना चौकाचौकात जल्लोश सुरू केला जात होता मात्र मजमोजणी सुरु झाल्यानंतर शहरातील कुठल्याच भागात प्रत्येक निवडणुकीच्यावेळी दिसणारा भाजप कार्यकर्त्यामधील उत्साह दिसून आला नाही.
सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला पोस्टल मतामध्ये भाजपच्या बाजूने येत असलेले निकाल कल बघता भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह होता मात्र जशजशी ईव्हीएम मजमोजणी सुरू झाली आणि विदर्भासह देशभरात भाजपाची होत असलेली पिछेहाट बघता धंतोली, गणेशपेठ येथील भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये अस्वस्था पसरलेली दिसत होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळत नसल्यामुळे कार्यकर्ते पुढच्या फेरीत काय होईल याबाबत अस्वस्था होती. अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यनी कळमना येथील मजमोजणी केंद्रात पोहचले. धंतोलीतील भाजपाच्या कार्यालयात दोन चार पदाधिकारी एकत्र बसून निकालावर चिंता व्यक्त करत होते. तर गणेशपेठ मधील कार्यलयात काही मोजके कार्यकर्ते टीव्हीवर माहिती घेत होते. उत्तप्रदेश, राजस्थानसह महाराष्ट्र आणि विदर्भात भाजपाची होत असलेली पिछेहाट बघता कार्यकर्त्यामध्ये चिंतेचे वातावरण होते. एरवी दुपारपासून बडकस चौक, महाल, धंतोली या भागात होत असलेला जल्लोश यावेळी दिसून आला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी घरी बसून अंदाज घेत होते. टीव्हीव्ही बसून ते देशभरातील निवडणुकीचा आढावा घेत होते.