नागपूर : महापालिकेत भाजपची युवा ब्रिगेड म्हणून ओळखली जाणारी जोशी-दटके जोडी आता आमदार म्हणून विधिमंडळात एकत्र येणार आहे.जोशी यांंना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. प्रवीण दटके आणि संदीप जोशी या भाजपच्या दोन्ही युवा नेत्याची राजकीय कारकीर्द भाजयुमोमधून सुरू झाली आणि बहरली महापालिकेत. दोघांची महापालिकेतील नगरसेवकपदाची कारकीर्द २००२ पासून सुरू झाली. दोघेही महापौर झाले. महापालिकेतील भाजपच्या दीड दशकाच्या सत्ताकाळात जोशी-दटके जोडींचा दबदबा होता.

दटके कालांतराने भाजपचे शहर अध्यक्षही झाले. जोशी यांनी संघटनेत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. दटके आणि जोशी यांना आमदार होण्याची संधीही एकाच वर्षी चालून आली. २०२० मध्ये दटके यांना पक्षाने विधान परिषदेवर नियुक्त झाले. याच काळात जोशी यांनाही नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची संधी पक्षाने दिली. पण जोशी पराभूत झाले. अन्यथा तेही आमदार झाले असते. पण ही संधी हुकल्याने आता पक्षाने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. विशेष म्हणजे, दटके यांचीच जागा जोशी विधान परिषदेत घेणार आहेत.

दटके विधानसभेत तर जोशी विधान परिषदेत किल्ला लढवणार आहेत. दोघांना महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव असल्याने व महापौरपदावर काम केल्याने नागरी प्रश्नांचा चांगला अभ्यास आहे. त्याचा फायदा त्यांना विधिमंडळात होणार आहे. विशेष म्हणजे, दोघेही फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत.

Story img Loader