यवतमाळ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेवून परत आले. याच दरम्यान अमेरिकने तेथील घुसखोर भारतीयांना हातापायांत बेड्या ठोकून विमानाने परत पाठविल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत फिरत आहे. भाजपचे प्रवक्ते तथा अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा केला. हा व्हिडीओ खरा असल्याचे सिद्ध झाल्यास आपण भाजपच्या वतीने अमेरिकेचा निषेध नोंदवू,असे ते म्हणाले.
अमेरिकेने सध्या तेथील घुसखोर भारतीयांना मायदेशी परत पाठविण्याची मोहीम हाती घेतली आहे. भारतीयांना परत पाठवताना त्यांना अत्यंत अपमानजनक व घृणास्पद वागणूक देवून त्यांच्या हाता, पायांत बेड्या ठोकून त्यांना विमानातून भारतात आणून सोडले जात असल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाले आहेत. याबाबत देशात दोन मतप्रवाह आहेत. भाजप व भाजप समर्थक हे व्हिडीओ खोटे असल्याचा दावा करत आहेत. तर विरोधक मात्र परराष्ट्र मंत्रालय व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीयांना अमेरिकेतून सन्मानाने परत आणण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत आहे.
भाजपचे प्रवक्ते तथा अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी आज शुक्रवारी यवतमाळ येथे केंद्रीय अर्थसंकल्पातून देशाला काय मिळाले? याचे विश्लेषण करण्याकरीता पत्रकार परिषद घेतली. यावेळी अमेरिकेतील घुसखोर भारतीयांना अमानुष पद्धतीने बेड्या ठोकून भारतात परत पाठविण्यात येत असल्याबाबत भाजपची भूमिका काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपने या प्रकाराचा अमेरिकेकडे निषेध का नोंदविला नाही? असे विचारले असता, ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी माध्यमांमधून चांगल्या गोष्टी दाखविल्याच जात नाही, असा आरोप केला. हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावाही त्यांनी केला. हा व्हिडीओ खरा असल्याचे सिद्ध झाल्यास आपण अमेरिकेचा निश्चितच निषेध नोंदवू, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणं आपण कधी समजून घेणार, असा प्रतिप्रश्न करत, मोदी यांच्यामुळेच भारत जगात महाशक्ती म्हणून उदयास आला आहे, हे मान्य करा, असा सल्ला मेश्राम यांनी यावेळी दिला. मात्र त्यांनी यावेळी भारतीय घुसखोरांना परत पाठविण्याच्या अमेरिकेच्या धोरणावर अधिक भाष्य करण्याचे टाळले.
७५ वर्षांत पहिल्यांदाच आयकर सूट
यावेळी अर्थसंकल्पाबाबत बोलताना ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशातील नागरिकांचा सर्वांगीण विचार करून सादर केल्याचे सांगितले. गेल्या ७५ वर्षांत अर्थसंकल्पातून पहिल्यांदाच देशवासीयांना आयकरातून मोठी सूट मिळाली आहे. युवा, अन्नदाता, महिला आणि शेतकरी या चार घटकांवर हा अर्थसंकल्प केंद्रीत असल्याचे ते म्हणाले.