नागपूर : त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपशी संबंधित लोकांनी जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचे काम केले. महाराष्ट्रात जातीय तणाव वाढवून दंगली घडवण्याचे षडयंत्र भाजप व त्यांच्याशी संलग्न संघटना करत असल्याचे मागील काही दिवसातील घटनांमुळे स्पष्ट झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. प्रदेश काँग्रेस कार्यालयाने आज निवेदन काढले. त्यामध्ये हे आरोप करण्यात आले. निवेदनात पटोले म्हणतात, राज्यातील सामाजिक एकोप्याला गालबोट लावत संभाजीनगर, अकोला, शेवगाव, अहमदनगर व आता त्र्यंबकेश्वरमध्ये जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचे काम सुरू आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदू महासभा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, भाजप आध्यात्मिक आघाडी, युवा मोर्चा, लव्ह जिहाद संघटना या भाजपच्या उपशाखांनी मंदिराच्या पायऱ्यावर गोमूत्र शिंपडून महाआरती केली. हिंदू शिवाय इतर धर्माच्या लोकांनी मंदिरात प्रवेश करू नये, असे फलक झळकवले. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजप लोकांमध्ये धार्मिक वाद घडवून आणत आहेत. अनाचार्य भोसले, हिंदू महासभेचे आनंद दवे, आमदार नितेश राणे यांच्यासह ज्यांनी त्र्यंबकेश्वरचे वातावरण बिघडवण्यास खतपाणी घातले. त्यांचीच चौकशी फडणवीस यांनी नेमलेल्या ‘एसआयटी’ने करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर गावाचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
ठाणे : त्र्यंबकेश्वर मंदिराला एक इतिहास आहे. मंदिर स्थापन झाले तेव्हापासून ते आजपर्यंत जातीय रंग देण्याचे वातावरण त्र्यंबकेश्वरमध्ये झाले नव्हते; परंतु आता संपूर्ण गावाचे वातावरण दूषित केले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. आव्हाड यांनी त्र्यंबकेश्वर ग्रामस्थांची एक पत्रकार परिषद गुरुवारी ठाण्यात आयोजित केली होती. त्र्यंबकेश्वर गावाची लोकसंख्या १४ हजार आहे. दररोज ४० हजार भाविक या ठिकाणी येत असतात. मंदिर परिसरात पूजेचे साहित्य विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असल्याने येथील विक्रेते मंदिराच्या पायरीवर डोके टेकवितात आणि धूप दाखवितात. मात्र आता एखादी संधी साधून संपूर्ण गावाचे वातावरण दूषित केले जात आहे. एका मंदिराचा विषय घेऊन माथी भडकविली जात आहेत. या गावाला उद्ध्वस्त करणे योग्य नाही, असे आव्हाड म्हणाले.