अकोला: काश्मीर येथील दहशतवादी हल्ला प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा आणि देशविरोधी मानसिकतेचा कळस आहे. काँग्रेस नेते आणि पाकिस्तान नेत्यांची भाषासारखीच आहे. देशभक्त जनतेच्या जखमांवर मीठ चोळणे थांबवा, अशी टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केली.

काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. त्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. चार दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यांनी गोळीबार करण्यापूर्वी पर्यटकांचा धर्म विचारला. हिंदुंवर गोळ्या झाडल्या गेल्या, असे बचावलेल्या पर्यटकांनी सांगितले. या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का? त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का? असे सवाल करून काही पर्यटक म्हणत आहेत की हल्लेखोरांनी धर्म विचारला, तर काहींचे म्हणणे आहे की असे काही घडलेच नाही. मुळात दहशतवाद्याचा धर्म किंवा त्याची कुठलीही जात नसते, असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून भाजपने आता विजय वडेट्टीवार यांना घेरले आहे. त्यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेत प्रदेश सरचिटणीस आमदार सावरकर यांनी प्रत्युत्तर दिले.

काश्मीरमध्ये हिंदुंना लक्ष्य केले जाते, हे आतापर्यंत वेळोवेळी सिद्ध झाले आहे. तरीही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार कोणत्या जगात वावरत आहेत. ‘‘दहशतवाद्याला जात-धर्म नसतो” असे म्हणून वडेट्टीवार कोणाला खूश करू पाहत आहेत? पाकिस्तानी नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांचे वक्तव्य सारखे का? काँग्रेस नेते दहशतवाद्यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत का? असे सवाल आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केले.

विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे दहशतवाद्यांचा चेहरा झाकण्याचा, त्यांना संरक्षण देण्याचा किळसवाणा प्रयत्न दिसत येतो. हा केवळ बेजबाबदारपणा नाही, तर देशविरोधी मानसिकतेचे उत्तम उदाहरण आहे, अशी टीका आमदार सावरकर यांनी केली.

देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयाने विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करायला हवा. काँग्रेसचे नेते भारतीयांच्या भावनांशी कायम खेळत असतात, जखमांवर मीठ चोळत काँग्रेस नेते राजकारण करीत आहेत, जनता हे विसरणार नाही, असेही आमदार सावरकर म्हणाले. काश्मीर हल्ला प्रकरणावरून काँग्रेस व भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.