नागपूर : भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य मूलभूत अधिकार बहाल केल आहे. ‘संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ’ याविषयावरील व्याख्यानाच्या कार्यक्रमात भाजपच्या युवा आघाडीने गोंधळ घालून आणि व्यत्यय आणून संविधान धोक्यात असल्याचे सिद्ध केले आहे, अशी भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त केली जात आहे.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ’ या विषयावर विदर्भात ठिकठिकाणी व्याख्यान आयोजित केले जात आहे. गेल्या बुधवारी नागपुरात व्याख्यान होते. यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. वास्तविक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि स्वत:ला हिंदुत्ववादी संघटना म्हणून घेणाऱ्यांमध्ये जुना संघर्ष आहे. धर्माच्या नावावर झुंडशाही करणाऱ्याविरुद्ध प्रा. श्याम मानव लढतात. त्यामुळे या संघटना त्यांचा विरोध करतात. आता प्रा. मानव यांनी संविधानच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यानही याविषयावर भाषणे केली होती. भाजपने त्याला ‘फेक नरेटीव्ह’ म्हणून हिणवले. परंतु आता प्रा. मानव यांना राजकीय विरोध सुरू झाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अंधश्रद्धेवर बोलावे, असे या संघटनांचे म्हणणे आहे. मूळात हा कार्यक्रम संविधानाशी संबंधित असल्याने स्वाभाविपणे संविधानाबाबत भाष्य केले गेले. परंतु या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवून या कार्यक्रमात गोंधळ घातल्याची बाब समोर आली आहे.
हे ही वाचा…“वर्ध्यातील चारही जागा भाजपच लढणार,’’ नितीन गडकरी यांच्या विश्वासू नेत्याचा दावा
दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेने हिंदूंनी महायुतीला मतदान करावे, असे आवाहन केले. हिंदूंची परिषद असेलतर त्यांनी धर्माविषयीक मार्गदर्शन करायला हवे. राजकीय भूमिका घेऊन हिंदूमध्ये संभ्रम का निर्माण केला जात आहे. या देशातील सर्व राजकीय पक्ष हिंदूंचे आहे तर मग एका विशिष्ट राजकीय पक्षाला मतदान करण्याचे आवाहन कसे काय केले जाऊ शकते, असा सवालही काही मान्यवरांनी केला आहे.
वास्तविक तर्कशुद्ध मांडणी करणाऱ्या प्रा. श्याम मानव यांना विरोध करण्यातील सातत्य दिसून येत आहे. यापूर्वी जानेवारी २०२३ ला नागपुरात भोंदूबाबा धीरेंद्र कृष्ण महाराज यांची पोलखोल करणाऱ्या कार्यक्रमात स्वत:ला हिंदूत्ववादी म्हणवणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला होता.
हे ही वाचा…वनविभागात चोर सोडून संन्याशाला फाशी !
प्रा.श्याम मानव यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा निषेध
संविधानिक मूल्यांची कशी पायमल्ली होत आहे, यावर प्रा. श्याम मानव प्रबोधन करीत आहेत. हीच बाब संविधानविरोधी लोकांना खटकलेली आहे. हेच या गोंधळ घालणा-यांच्या प्रवृत्तीतून दिसून आले आहे. तो लोकशाही मूल्य व संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. वास्तविक त्यांनी याविरुद्ध स्वतंत्र कार्यक्रम घेवून याचा प्रतिवाद करणे अभिप्रेत आहे. तात्पर्य भाजयुमोची ही कृती संविधानविरोधी असल्याचे निदर्शनास येते. किंबहुना ही मंडळी लोकशाहीच्या विरोधात व संविधानाच्या विरोधात आहे. हेच त्यांनी या कृतीतून सिद्ध केलेले आहे, असे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील वंजारी म्हणाले.