लोकसत्ता टीम
बुलढाणा: ‘सुजलाम सुफलाम’ मोहिमेच्या माध्यमाने बुलढाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळमुक्त करण्याचे मोठे काम भारतीय जैन संघटनेने केले. शिक्षणाच्या संदर्भातही ‘बिजेएस’ ने भरीव काम केले आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवारातील आणि कोविडमुळे दगावलेल्या पालकांच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे.
संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या पुढाकाराने यासाठी पुणे येथे सुसज्ज वाघोली शैक्षणिक पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले आहे. सध्या या केंद्रात राज्यातील तब्बल २५० विध्यार्थी, विद्यार्थीनी दर्जेदार शिक्षण घेत आहे. त्यांच्या इयत्ता बारावीपर्यंतच्या शिक्षण, निवास, भोजन, आरोग्य, औषधोपचाराची जबाबदारी संघटनेने स्वीकारली आहे. शेतकरी असलेल्या आई किंवा वडील यांनी आत्महत्या केली असेल किंवा करोनामुळे आई, वडील यापैकी एकाचा किंवा दोघांचा मृत्यू झाला आहे, अश्या पाल्याना या केंद्रात प्रवेश देण्यात येतो.
यंदा ऐंशी विध्यार्थ्यांना प्रवेश
दरम्यान यंदाच्या सत्रात वरील वर्गवारीतील ऐंशी पाल्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा स्थानिय व्यावसायिक राजेश देशलहरा यांनी ‘लोकसत्ता’ सोबत बोलताना ही माहिती दिली. पाचवीमध्ये ५० तर सहावीत ३० जणांना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी परिपूर्ण अर्ज २० मे पर्यंत वाघोली शैक्षणिक पुनर्वसन केंद्र, भारतीय जैन संघटना विध्यार्थी वसतिगृह, बकोरी फाटा, पुणे – नगर मार्ग, वाघोली येथे सादर करण्याचे आवाहनही देशलहरा यांनी केले.