लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : मध्य रेल्वे मार्गावर जलंब – शेगांव विभागात स्वयंचलित ‘सिग्नलिंग’ प्रणालीचे काम पूर्ण झाले. या स्वयंचलित ‘सिग्नलिंग’ प्रणालीमुळे रेल्वे गाड्या कमी वेळेत पास होईल. रेल्वे गाड्यांचा खोळंबा टळणार असून वेग वाढणार आहेत. एकाच वेळी एकाच मार्गाने धावणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांमधील अंतर कमी होणार असल्याने त्या निर्धारित वेळेत धावण्यासाठी मदत होणार आहे.

भुसावळ – बडनेरा मार्गावरील १२.२९ किलो मीटरच्या जलंब – शेगांव विभागात स्वयंचलित ‘सिग्नलिंग’ यंत्रणा १० ऑगस्टपासून यशस्वीरित्या कार्यान्वित झाली आहे. जलंब आणि शेगांव रेल्वेस्थानकादरम्यान स्वयंचलित ‘सिग्नलिंग’ प्रणाली कामाच्या अंमलबजावणीसाठी चार दिवस पूर्व ‘नॉन इंटरलॉकिंग’ आणि एक दिवस ‘नॉन इंटरलॉकिंग’ कार्य दोन तास ३० मिनिटे अप आणि डाऊन मार्गावर ‘ट्रॅफिक ब्लॉक’ चे नियोजन करण्यात आले होते. हे आता काम पूर्ण झाले आहे. याचे काम सुरू झाल्यानंतर जलंब आणि शेगांव रेल्वेस्थानकादरम्यान एक परिपूर्ण ब्लॉक विभाग स्वयंचलितमध्ये रुपांतरित झाला. यामध्ये १६ स्वयंचलित सिग्नल आणि चार ‘सेमीऑटोमॅटिक सिग्नल’ आहेत.

आणखी वाचा-झेंडावंदन! ‘नेत्यांनो लाभापासून तटस्थ असावे’ कुणाचा हा उपदेश?

स्वयंचलित ‘सिग्नलिंग’ प्रणालीमध्ये वाहतुकीच्या घनतेनुसार सुमारे प्रत्येक एक किमी अंतरावर किंवा ४०० मीटर अंतरावर सिग्नल लावण्यात आले. त्यामुळे जास्त गाड्या चालवता येतील. एक रेल्वे गाडी एकदा सिग्नल पास केल्यानंतर ती पुढच्या स्थानकावर पोहोचण्याच्या आधीच त्याच्या मागून दुसरी रेल्वे गाडी पाठवली जाऊ शकणार आहे. या प्रणालीमध्ये ‘सिग्नल्स’ची संख्या वाढवली असल्याने जास्त गाड्या पाठवता येतील. आता जलंब आणि शेगांव रेल्वेस्थानकांदरम्यान विभागामध्ये प्रत्येक एक किमी अंतरावर सिग्नल बसवले आहेत. या प्रकारे प्रत्येक एक किमी अंतरावर ‘सेक्शन’मध्ये एक रेल्वे गाडी धावू शकते. यामुळे गाड्यांचा वेग वाढेल आणि गाड्यांचा खोळंबा कमी होईल. कमी वेळेत जास्त गाड्या चालवता येतील, अशी माहिती मध्य रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

आणखी वाचा-मान्सून अलर्ट : मध्य भारतात पुन्हा सक्रिय होणार

‘नॉन इंटरलॉकिंग’मधून यंत्रणांचे अद्ययावतीकरण

मध्य रेल्वेच्या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून वारंवार ‘नॉन इंटरलॉकिंग’ घेतले जात आहे. त्यामुळे अनेक प्रवासी गाड्यांच्या फेऱ्या रद्द होणे, मार्ग बदलणे किंवा गाड्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावण्याचे प्रकार घडतात. रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र, ‘नॉन इंटरलॉकिंग’ घेऊन रेल्वेच्या यंत्रणांचे अद्ययावतीकरण केले जात असून त्याचा मोठा लाभ प्रवाशांनाच होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blockage of railway trains will be avoided automatic signalling system work completed ppd 88 mrj