यवतमाळ : समाजातील दलित, वंचित, मागास घटकांना ‘जयभीम’ या एका नाऱ्याने लढण्याचे बळ देवून जगण्याचा मार्ग दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्चवर्णीयांच्या विळख्यात जगणं हरवलेल्या समाजाला दिशा देवून त्यांच्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय मागासलेपण दूर केले आणि समाज मुख्य प्रवाहात आला. बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना ओठातून सहज ‘जयभीम’ असा उद्घोष निघतो. पण यवतमाळात आज अनेक ठिकाणी ‘जयभीमवाला उमेदवार देणार का’ हा प्रश्न लिहिलेले फलक सर्वच राजकीय पक्षांना सणसणीत चपराक हाणणारे ठरले आहे.
शहरातील संविधान चौक, पूनम चौक आदी वर्दळीच्या ठिकाणी ‘आपण आगामी विधानसभा निवडणुकीत ‘जयभीम’वाला उमेदवार देणार का?’ असा रोखठोक प्रश्न सर्वच पक्षांना विचारला आहे. या फलकावर, ‘प्रति, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पाटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेस पाटी (अजित पवार गट), शिवसेना (उबाठा), शिवसेना (शिंदे गट) आणि वंचित बहुजन आघाडी… आपण आगामी विधानसभा निवडणुकीत जयभीमवाला उमेदवार देणार का?’ असा मजकूर असलेला प्रश्न ‘आम्ही यवतमाळ विधानसभा जयभीमवाला मतदार’ या नावाने विचारण्यात आला आहे.
हेही वाचा…गडचिरोली : नक्षल्यांशी दोन हात करणाऱ्या १७ पोलीस जवानांना शौर्य पदक
या फलकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठळकपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक चौकात लागलेल्या या फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधले आहे. हे फलक कोणी लावले, याबाबत अनभिज्ञता आहे. मात्र, आज शहरातील नागरिक या फलकाबाबत चर्चा करत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी होते.
जयभीमवाला उमेदवार म्हणजे डॉ. बाबासाहेब यांना मानणारा कोणत्याही समाजाचा अनुयायी की केवळ बौद्ध समाजाचा उमेदवार, याबाबत या फलकावरील मजकुरात कोणतीही स्पष्टता नाही. परंतु, या फलकावर नमूद सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील जयभीमवाला उमेदवार दिला नाही. त्याची खदखद बौद्ध समाजात आहे.
हेही वाचा…नागपूर: ‘लेझर शो’मुळे गोसेखुर्दचे सौंदर्य फुलले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेूवन राजकारणात स्थिरावलेले वंचित बहुजन आघाडी, रिपाईं हे पक्षही अलीकडे सोयीचे राजकारण करत असून, बौद्ध समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याची या समाजाची भावना झाली आहे. त्याबाबत समाजातून अनेकदा विचारमंथनही झाले आहे.
हेही वाचा…नाना पटोले म्हणतात,‘महायुतीची लाडकी आमची खुर्ची योजना…’
परंतु, निवडणुकीच्या वेळी अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाचा सोईस्कर वापर करून त्यानंतर सर्वच पक्ष या घटकाकडे दुर्लक्ष करतात, ही जनभावना आहे. त्यामुळे सर्वच पक्षांसह जनेतेचे लक्ष वेधण्यासाठी तर शहरातील विविध चळवळीत सक्रिय असणाऱ्या बुद्धिप्रामाण्यवादी नागरिकांनी हे फलक लावले नाही ना, अशी चर्चा आहे.