बुलढाणा : मेहकर तालुक्यातील अंत्री खेडेकर येथे पैनगंगा नदीत नाव उलटल्याने एका शेतमजूर महिलेचा मृत्यू झाला. वयोवृद्ध महिलेसह युवकांनी सहा महिलांचे प्राण वाचविल्याने संभाव्य भीषण अनर्थ टळला. दरम्यान, गाळात फसलेला मृतदेह रविवारी रात्री उशिरा बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले.

हेही वाचा – वर्धा : नद्या होणार अमृत वाहिन्या, उगमस्थानापासून स्वच्छता

हेही वाचा – चंद्रपूर : शासकीय कार्यक्रमातच ‘जुनी पेन्शन योजना’ हे गीत सादर, चर्चेला उधाण

मेहकरनजीकच्या अंत्री देशमुख या गावातील काही शेती ही उकळी शेतशिवारात आहे. त्यामुळे गावकरी, शेतमालक, शेतमजुरांना पैनगंगा नदी ओलांडून उकळी शिवारात जावे लागते. त्यासाठी तब्बल २२ वर्षांपासून छोट्या नावेचा वापर करण्यात येत आहे. शनिवारी संध्याकाळी सरुबाई रामभाऊ राऊत (४५), कोकनबाई बाळासाहेब जाधव (६५), सरला मोहन राऊत (३५ ), छाया सुरेश माकोडे (५९), सागर ज्ञानेश्र्वर आखाडे (३५), मंदा देशमुख (३५), लक्ष्मी प्रदीप सुरुशे (३३) या महिला नावेत बसल्या. नेहमीप्रमाणे दोरी ओढत असताना पात्राच्या मध्यभागी नाव उलटली. कोकनबाई या ६५ वर्षीय वृद्ध महिलेने जिवाची बाजी लावून बुडणाऱ्या तीन महिलांना किनाऱ्यावर पोहोचवले. दुसरीकडे जीवन राऊत (१६) याने ३ महिलांना वाचवून किनाऱ्यावर आणले. मात्र सरूबाई राऊत (४५) या आढळून आल्या नाही. रात्री उशिरा नदीच्या गाळात फसलेला सरूबाईचा मृतदेह सापडला.

Story img Loader