मृतदेहांना दरुगध सुटल्याने घटना उघडकीस
नागपूर : तात्या टोपेनगर परिसरातील एका बंद घरातून अचानक दरुगध येऊ लागला आणि परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला असता वृद्ध बहीण-भावाचे मृतदेह सापडले. त्याच्या घरातील पाळीव कुत्राही मृतावस्थेत होता.
मोहनलाल रंजूमल ओतवानी (७०) आणि शांता रंजूमल ओतवानी (६५) अशी मृतांची नावे आहेत. तात्या टोपेनगरातील पेट्रोल पंपाला लागून त्यांचे घर आहे. त्या घरी दोघेच बहिण भाऊ अनेक वर्षांपासून राहात होते. मोहनलाल हे रेल्वेतून सेवानिवृत्त होते. दोघांचाही स्वभाव विचित्र असल्याने एकही नातेवाईक त्यांच्याकडे येत नव्हते. परिसरातील नागरिकांशीही त्यांचा फारसा संबंध नव्हता. त्यांच्या घराचे फाटक व दार नेहमी बंद असायचे. वीज विभाग किंवा टपाल विभागाचे कर्मचारी कामानिमित्त त्यांच्याकडे आल्यासही ते दरवाजा उघडत नव्हते. त्यांना बाहेरच्या बाहेरून हाकलून लावायचे. शेजारच्या पेट्रोल पंप संचालक आपल्या घराची जागा बळकावेल म्हणून
त्यांनी सुरक्षा भिंत खूप उंच बांधली होती. दोघेही वृद्ध असल्याने त्यांच्याकडे पोलिसांचा मोबाईल क्रमांक होता. जवळपास महिनाभरापूर्वी त्यांनी पोलिसांना भ्रमणध्वनी केला होता. त्यानंतर त्यांचा कुणाशी काही संपर्क नाही.
रविवारपासून त्यांच्या घरातून दरुगध येत होता. सोमवारी दरुगध अधिक तीव्र झाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस त्यांच्या घरी गेले. दरवाजाला कुलूप लागलेले होते. पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी पायऱ्यांजवळ शांता यांचा मृतदेह पडलेला दिसला, तर एका खोलीत मोहनलाल यांचा व दुसऱ्या खोलीत कुत्रा मृतावस्थेत सापडला.
जवळपास चार ते पाच दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या घराच्या संपत्तीसाठी त्यांचा खून करण्यात आला की वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.