वर्धा : बियाणे बोगस असल्याची बाब शेतकऱ्यांची दगाबाजी ठरते. या बोगस बियाण्याची विदर्भात चौदा हजार एकरात विक्री झाल्याचा संशय आहे. म्हणून कठोर कारवाई करण्यासाठी या प्रकरणात सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी आज लोकसभेत केली.
वर्धा जिल्ह्यात एका गोदामातून दीड कोटी रुपये किमतीचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले होते. त्याचा संदर्भ देत खासदारांनी आज केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे हा मुद्दा लावून धरला. बोगस बियाणे विक्रीची अनेक राज्यांतील व्याप्ती लक्षात घेऊन हे प्रकरण तपासले पाहिजे. या टोळीने १४ टन बोगस बियाणे विकले आहे. त्याची मोठ्या प्रमाणात लागवड पण झाली, त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
हेही वाचा – नागपूर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
हेही वाचा – सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; नागपुरातील आजचे दर पहा…
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन चौकशी व्हावी व दोषींना कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे. त्यामुळे भविष्यात कोणी असा गैरप्रकार करणार नाही. शेतकरी अत्यंत नियोजनबद्ध पेरणीची व्यवस्था करत असतो. त्याच्या विश्वासाला तडा गेला आहे. म्हणून सर्व सत्य बाहेर आले पाहिजे, असे खासदार तडस यांनी स्पष्ट केले असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.